मुंबईचे डबेवाले स्वत:ची कंपनी स्थापणार
By Admin | Updated: January 18, 2016 17:06 IST2016-01-18T13:35:06+5:302016-01-18T17:06:55+5:30
टाईम मॅनेजमेंटचे उत्तम उदहारण आणि मुंबईची ओळख असलेले डबेवाले आता स्वत:ची कंपनी स्थापन करणार आहेत.

मुंबईचे डबेवाले स्वत:ची कंपनी स्थापणार
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १८ - टाईम मॅनेजमेंटचे उत्तम उदहारण आणि मुंबईची ओळख असलेले डबेवाले आता स्वत:ची कंपनी स्थापन करणार आहेत. नव्या कंपनीच्या माध्यमातून जेवणाचे डबे पोहोचविण्याशिवाय दूध, फऴभाज्या आणि अन्य वस्तूंचा बहुराष्ट्रीय कंपन्यांना पुरवठा करण्याची डबेवाल्यांची योजना आहे.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांना काही सेवांसाठी डबेवाल्यांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. त्यामुळे निकट भविष्यात कंपनीच्या माध्यमातून जेवण्याच्या डब्यांशिवाय अन्य सेवा देण्याची आमची योजना आहे असे मुंबई डबेवाला संघटनेचे समन्वयक सुबोध सांगळे यांनी अहमदाबादमध्ये आयोजित आयआयएमच्या कार्यक्रमात सांगितले.
डबेवाल्यांना भौगोलिक भागांची व्यवस्थित माहिती असते आणि आमच्या सेवेने ग्राहकांची अपेक्षा पूर्ण होते. एखाद्या प्रसंगीच डबेवाल्यांच्या कामामध्ये तुम्हाला त्रुटी दिसून येईल असे सांगळे यांनी सांगितले. डबेवाल्यांमधील जवळपास ५० जणांनी जेवणाच्या डब्यांसह दूध, भाज्यांचा पुरवठा सुरु केला आहे.
निकट भविष्यात आम्ही बहुराष्ट्रीय कंपन्यांबरोबर करार करुन नवीन सेवा सुरु करु असे त्यांनी सांगितले. बेरोजगार युवकांना रोजगार मिळावा या हेतुने १८९० मध्ये महादेव हावजी बच्चे यांनी डब्बेवाला संघटनेची स्थापन केली.