अनेक धरणांत आढळल्या त्रुटी!
By Admin | Updated: July 18, 2015 00:09 IST2015-07-18T00:09:56+5:302015-07-18T00:09:56+5:30
राज्यातील सुमारे ४०० धरणे धोकादायक असल्याच्या मुद्द्यावरून आज विधानसभेत तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली. धरणांच्या दुरुस्तीसाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्याची मागणीही या वेळी झाली.

अनेक धरणांत आढळल्या त्रुटी!
मुंबई : राज्यातील सुमारे ४०० धरणे धोकादायक असल्याच्या मुद्द्यावरून आज विधानसभेत तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली. धरणांच्या दुरुस्तीसाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्याची मागणीही या वेळी झाली.
सरकारच्या धरणविषयक समितीने केलेल्या पाहणीत राज्यातील ४०० धरणांमध्ये गंभीर त्रुटी असल्याचे आढळून आल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. हा मुद्दा आज सुभाष पाटील, धैर्यशील पाटील व जिवा पांडू गावित यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून उपस्थित केला. टेमघर आणि वरसगाव या धरणांची स्थिती अतिशय नाजूक असल्याने याबाबत तातडीची उपाययोजना करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
अधिवेशन संपल्यानंतर या धरणांची पाहणी आपण स्वत: करू, असे आश्वासन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले. धरणांच्या दुरुस्तीसाठी किती निधी आवश्यक आहे याचा अभ्यास करून तो वेगळा राखून ठेवण्याबाबतचा विचार करण्यात येईल, असे राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी स्पष्ट केले.
टेमघर धरण २०१०मध्ये बांधून पूर्ण झाले; मात्र त्यात खूप गळती असल्याचे दिसून आले आहे. याची तत्काळ दुरुस्ती करण्यास ठेकेदारास सांगण्यात आले होते. मात्र वारंवार नोटीस बजावूनही त्याने दखल घेतलेली नाही. म्हणून सरकारने स्वत:च्या निधीतून दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. ठेकेदारास कोणत्याही परिस्थितीत हे काम करण्यास भाग पाडण्यात येईल, असे गिरीश महाजन म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)
धरणस्थिती अहवालात १२२६ धरणांपैकी यवतमाळमधील निगनूर, रायगडमधील आंबेघर व कुडकी या तीन धरणांमध्ये गंभीर त्रुटी आढळल्या आहेत. यापैकी कुडकी धरणाची दुरुस्ती झाली असून, निगनूर व आंबेघर धरणाची दुरुस्ती करायची असून, या धरणांना अद्याप धोका निर्माण झालेला नसल्याची माहिती विजय शिवतारे यांनी दिली. शिवसेनेचे शंभुराज देसाई यांनी या वेळी धरणांच्या दुरुस्तीसाठी स्वतंत्र निधी राखून ठेवा, अशी मागणी केली.