मुंबई : राज्याचे माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांची शासकीय पदावरून हकालपट्टी करा, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (ए)चे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष उत्तम खोब्रागडे यांनी राज्यपाल विद्यासागर राव यांच्याकडे केली आहे. शुक्रवारी पत्रकार परिषदेत खोब्रागडे बोलत होते.आंबेडकर भवन पाडण्यात गायकवाड यांची प्रमुख भूमिका होती, असा आरोप खोब्रागडे यांनी केला आहे. ते म्हणाले की, शासकीय पदावर असताना अशासकीय संस्थांमध्ये विश्वस्त आणि सल्लागार अशा पदांवर गायकवाड कार्यरत होते. गायकवाड यांच्याविरोधात गुन्हे दाखल आहेत. पदावर राहण्याचा नैतिक अधिकार त्यांना नाही.एमएमआरडीएच्या आयुक्त पदावर असताना गायकवाड यांनी कांदिवली येथील भूखंडामध्येही हजार कोटींचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप खोब्रागडे यांनी केला आहे. ते म्हणाले की, गायकवाड यांनी पदाचा गैरवापर करून कांदिवलीच्या आकुर्ली येथील शासनाचा १० एकर भूखंड एका विकासकाच्या घशात घालण्याचे काम केले. शासनाच्या मालकीचा भूखंड एमएमआरडीएकडे संरक्षणासाठी देण्यात आला होता. त्याची विल्हेवाट लावण्याचा कोणताही अधिकार एमएमआरडीए प्रशासनाला नव्हता. मात्र तरीही गायकवाड यांनी तो विकासकाला मिळवून दिला, असेही त्यांनी सांगितले. राज्यपाल आणि एसीबीकडे चौकशी करावी, म्हणून तक्रार केल्याचेही खोब्रागडे यांनी स्पष्ट केले.
गायकवाड यांची हकालपट्टी करा - खोब्रागडे
By admin | Updated: August 20, 2016 01:56 IST