बारावीचा एस.पी.चा पेपरही व्हॉट्सअॅपवर व्हायरल
By Admin | Updated: March 4, 2017 15:29 IST2017-03-04T15:20:58+5:302017-03-04T15:29:22+5:30
बारावीच्या मराठी विषयाच्या पेपर पाठोपाठ आता वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांचा एसपी (सेक्रेटरीयल प्रक्टिस) विषयाचा पेपरही आज व्हॉट्स अॅपवर व्हायरल झाला.

बारावीचा एस.पी.चा पेपरही व्हॉट्सअॅपवर व्हायरल
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 4 - बारावीच्या मराठी विषयाच्या पेपर पाठोपाठ आता वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांचा एसपी (सेक्रेटरीयल प्रक्टिस) विषयाचा पेपरही आज व्हॉट्स अॅपवर व्हायरल झाला. परीक्षा सुरू होणाच्या 15 मिनिटे आधी पेपर फुटल्याने एकच खळबळ उडाली आहे. सकाळी 10.47 वाजण्याच्या सुमारास एसपी विषयाचा पेपर व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाला. या प्रकरणी राज्य शिक्षण मंडळाचे मुंबई विभागाचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी वाशी पोलीस ठाण्यात धाव घेतली.
बारावीचा पेपर फुटीची ही दुसरी घटना आहे. गुरुवारी मराठी विषयाचा पेपर 10.43 वाजता व्हाट्स अॅपवर आला होता. या प्रकरणी सायबर सेल अधिक तपास करत आहे. गेल्या 3 वर्षांपासून बॉर्डाला व्हाट्स अॅपची डोकेदुखी होत आहे. या समस्येवर काय उपाय करायचा यावर सध्या काम सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
दरम्यान, एस.पी.विषयाच्या पेपरची फेरपरीक्षा होणार नसल्याचे जगताप यांनी सांगितले. बारावीचा दुसरा पेपर व्हाट्स अॅप वर आल्याने आता 10 मिनिटे आधी पेपर मुलांना द्यायचा का नाही, यावर देखील फेरविचार सुरू आहे. येत्या मंगळवारपासून दहावीची परीक्षा सुरू होणार आहे, त्यामुळे आता बोर्डाचे अधिकारी विशेष काळजी घेण्यासाठी सज्ज झाले आहेत.