गोपीनाथ मुंडेंच्या स्मरणार्थ राज्यात पर्यावरण सप्ताह
By Admin | Updated: May 29, 2015 01:19 IST2015-05-29T01:19:27+5:302015-05-29T01:19:27+5:30
पर्यावरण दिनाचे औचित्य साधून माजी केंद्रीय मंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या स्मरणार्थ राज्यात पर्यावरण सप्ताह राबविला जाणार आहे.

गोपीनाथ मुंडेंच्या स्मरणार्थ राज्यात पर्यावरण सप्ताह
यवतमाळ : पर्यावरण दिनाचे औचित्य साधून माजी केंद्रीय मंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या स्मरणार्थ राज्यात पर्यावरण सप्ताह राबविला जाणार आहे. दरवर्षी ३ ते ९ जून या कालावधीत राबविल्या जाणाऱ्या सप्ताहात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली जाणार आहे. जलयुक्त शिवार अभियानासाठी निवडलेल्या गेलेल्या गावांना प्राधान्य दिले जाणार आहे.
५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून पाळला जातो. या दिवशी पर्यावरणाचा समतोल राखण्याबाबत जनजागृती केली जाते. शिवाय वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेतला जातो. गोपीनाथ मुंडे यांचे राज्य आणि देशासाठी असलेले योगदान विचारात घेत हा सप्ताह राबविला जाणार आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वृक्ष लागवड केली जाणार आहे. शाळा, महाविद्यालये, अंगणवाडी, आरोग्य केंद्र, समाज मंदिर, गावठाण, गायरान, ग्रामपंचायतीच्या मालकीची जागा, शासकीय-निमशासकीय कार्यालय आणि रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्यास प्राधान्य देण्याचे निर्देश नियोजन विभागाने २६ मे रोजी जारी केले आहेत.
सामाजिक वनीकरण विभाग पुणेचे मुख्य वनसंरक्षक यांना रोपे पुरवण्याची जबाबदारी दिली आहे. जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पर्यावरण सप्ताहाचे आयोजन करावे, असे शासन निर्णयात म्हटले आहे. (वार्ताहर)
अहवाल द्यावा लागणार
पर्यावरण सप्ताहात हाती घेतलेल्या कार्यक्रमांचा अहवाल विभागीय आयुक्तांना २० जूनपर्यंत सादर करावा लागणार आहे. शिवाय या दृष्टीने कार्यक्रमांची रुपरेषाही त्यांनाच ठरवावी लागणार आहे.