नाशिकमध्ये उपक्रम : दर शनिवारी ‘दप्तराला’ सुटी

By Admin | Updated: September 26, 2016 23:19 IST2016-09-26T23:19:29+5:302016-09-26T23:19:29+5:30

ते शनिवारी खूप खूश असतात. दप्तर नाही की शाळेत अभ्यासाचा त्रास नाही, कुणी खेळतंय, तर कोणी वाचन करतंय, कोणी प्रयोग करतोय, तर कुणी विविध वस्तू हाताळतोय..

Entrepreneurship in Nashik: Every Saturday on 'Dattatra' Holidays | नाशिकमध्ये उपक्रम : दर शनिवारी ‘दप्तराला’ सुटी

नाशिकमध्ये उपक्रम : दर शनिवारी ‘दप्तराला’ सुटी

संजय पाठक

नाशिक,दि. २६ : ते शनिवारी खूप खूश असतात. दप्तर नाही की शाळेत अभ्यासाचा त्रास नाही, कुणी खेळतंय, तर कोणी वाचन करतंय, कोणी प्रयोग करतोय, तर कुणी विविध वस्तू हाताळतोय...शाळेत अशा प्रकारची मजा अनुभवणारी ही मुले आहेत महापालिका शिक्षण मंडळाच्या शाळेतील ! गेल्या महिनभरापासून मंडळाने शनिवारी दप्तराला सुटी उपक्रम राबविला असून, पर्यायी ज्ञानाची साधने उपलब्ध करून दिल्याने मुलांचे शनिवारी शाळेत येण्याचे प्रमाण वाढले आहे.

राज्यात गेल्या दीड ते दोन वर्षांपासून शाळकरी विद्यार्थ्यांवर दप्तराच्या ओझ्याचा विषय गाजत आहे. वह्या-पुस्तकांचे जड ओझे वागवणारे विद्यार्थी मान आणि पाठेच्या विकारांमुळे त्रस्त आहे. जड दप्तर नेणे कोणालाही आवडत नाही. त्यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलांच्या संख्येवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. यापार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या शिक्षण खात्याने शाळांना दप्तराचे ओझे कमी करण्याच्या सूचना करतानाच अनेक शाळांमध्ये दप्तर तपासणीही केली. त्यामुळे आता शाळा विविध उपक्रम राबवित आहेत. त्याच धर्तीवर नाशिक महापालिका शिक्षण मंडळाने गेल्या महिनाभरापासून दप्तराला सुटीचा प्रयोग सुरू केला आहे. मनपा शिक्षण मंडळाच्या १२८ शाळेतील सुमारे ३२ हजार मुले त्यामुळे शनिवारी आनंददायी पद्धतीने ज्ञानार्जन करीत आहेत.

महापालिकेच्या शाळांमध्ये येताना दर शनिवारी दप्तराची सुटी दिल्यानंतर मुलांचा अभ्यास होत नाही असे नाही, तर त्यांना अन्य प्रकारचे शिक्षण दिले जाते. कला, खेळ आणि कार्यानुभव हे तीन विषय प्रामुख्याने शिकविले जातात. त्यामुळे मुले चित्रे काढतात, वेगवेगळे खेळ खेळतात शिवाय कार्यानुभवाच्या माध्यमातून विविध वस्तू दुरुस्त करणे आणि अन्य कामेही करतात. सर्व शिक्षा अभियानांतर्गत शिक्षण मंडळाने मानधन, तासिकेवर शिक्षक नियक्त केले असून, तेच प्रामुख्याने हे विषय हाताळतात. भाषा आणि गणिताचे तासही होतात. परंतु तेही हसत खेळत! भाषेच्या तासाला अवांतर वाचन करून घेतले जाते. समजा, कोणत्याही विद्यार्थ्याला पाठ्यक्रमाचे पुस्तक लागलेच तर शाळेत तसे अतिरिक्त पुस्तके असल्याने अध्यापनात व्यत्यय येत नाही. गेल्या महिनाभरापासून हा उपक्रम सुरू असून, त्यामुळेच मुलांची शनिवार - रविवार अशी सलग सुटी घेण्याची मानसिकता कमी झाल्याचे शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी नितीन उपासनी यांनी सांगितले.

मुलांचा सकारात्मक प्रतिसाद
मनपा शिक्षण मंडळाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या उपक्रमामुळे मुले समाधानी असून, अध्ययनात रस घेत आहेत. दफ्तर न आणता मुले शाळेत येतात आणि सर्वच उपक्रमात सहभागी होतात.

Web Title: Entrepreneurship in Nashik: Every Saturday on 'Dattatra' Holidays

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.