साहित्य संमेलनासाठी नावनोंदणी १ डिसेंबरपासून
By Admin | Updated: November 19, 2014 04:58 IST2014-11-19T04:58:29+5:302014-11-19T04:58:29+5:30
पंजाबच्या घुमान येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमांची ढोबळमानाने रूपरेषा निश्चित करण्यात आली

साहित्य संमेलनासाठी नावनोंदणी १ डिसेंबरपासून
पुणे : पंजाबच्या घुमान येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमांची ढोबळमानाने रूपरेषा निश्चित करण्यात आली असून, यंदाही कविसंंमेलन, परिसंवाद, मुलाखती आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी रसिकांना मिळणार आहे. संमेलनासाठीच्या प्रतिनिधी शुल्क नोंदणीला १ डिसेंबरपासून सुरुवात होत आहे, अशी माहिती साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
संत नामदेव यांच्या घुमान या कर्मभूमीत ३ ते ५ एप्रिलदरम्यान साहित्य संमेलन रंगणार आहे. यासंदर्भात साहित्य महामंडळ आणि संयोजन समितीची नुकतीच कलबुर्गी येथे बैठक झाली. त्यामध्ये संमेलनामधील कार्यक्रमांचा संक्षिप्त तपशील महामंडळातर्फे जाहीर करण्यात आला. पहिल्या दिवशी ग्रंथदिंडी, ध्वजारोहण, उद्घाटन आणि निमंत्रितांचे कविसंमेलन होईल. दुसऱ्या दिवशी ४ एप्रिल रोजी मुलाखत, ४ परिसंवाद आणि सेलिब्रिटींचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. तिसऱ्या दिवशी मुलाखत, अभिरूप न्यायालय, २ परिसंवाद आणि निमंत्रितांचे कविसंमेलन रंगणार आहे. संमेलनाच्या उद्घाटन आणि समारोपाला पंजाबी-हिंदी साहित्यकांना आमंत्रित करण्यात आले आहे. त्यानुसार संमेलनाच्या समारोपाला ज्ञानपीठ पुरस्कार विजेते उर्दू साहित्यिक रहमान राही उपस्थित राहणार आहेत. संमेलनासाठी प्रवास, निवास, जेवण यांकरिता ३ हजार रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आह. (प्रतिनिधी)