इंग्रजीचा पेपर फुटला
By Admin | Updated: March 1, 2017 05:29 IST2017-03-01T05:29:19+5:302017-03-01T05:29:19+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला मंगळवारपासून प्रारंभ झाला.

इंग्रजीचा पेपर फुटला
बुलडाणा/पुणे/नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला मंगळवारपासून प्रारंभ झाला. मंगळवारी सकाळी ११ वाजता सुरू झालेला इंग्रजीचा पेपर अवघ्या चार मिनिटांतच ‘व्हॉटसअॅप’वर व्हायरल झाल्याचा प्रकार बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथे उघडकीस आला. तर परीक्षा केंद्र बदलल्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली गेली नसल्याने नवीन परीक्षा केंद्र शोधताना विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाल्याचे चित्र पुणे विभागात पाहायला मिळाले.
बारावीची परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात व्हाव्यात, यासाठी मोठ्या प्रमाणात दक्षता घेतली जात आहे. परीक्षा केंद्रावर सीसीकॅमेरेही लावले जात आहेत. कडक पोलीस बंदोबस्त तसेच भरारी पथकांचीसुद्धा नियुक्ती करण्यात आली आहे. एवढी कडक सुरक्षा व्यवस्था असूनही मंगळवारी अवघ्या चार मिनिटांतच इंग्रजीचा पेपर व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाला. हा प्रकार पेपर संपल्यानंतर कानावर आला. याबाबत वरिष्ठांशी बोलणे झाले असून त्यांच्या मार्गदर्शनानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती खामगावचे गटशिक्षणाधिकारी जी. डी. गायकवाड यांनी दिली.
परीक्षा मंडळाने मात्र असा प्रकारच झाला नसल्याचा दावा केला आहे. ‘व्हॉट्सअॅप’च्या माध्यमातून पेपर फुटणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे. तसेच राज्यात कुठेही ‘व्हॉट्सअॅप’द्वारे पेपर फुटल्याची माहिती राज्य मंडळाला प्राप्त झालेली नाही, असे राज्य मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी सांगितले. तर दुसरीकडे परीक्षा केंद्र बदलल्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली गेली नसल्याने परीक्षा केंद्रावर अनेकांना वेळेत पोहोचता आले नाही. राज्य मंडळाच्या चुकीच्या नियोजनामुळेच विद्यार्थ्यांवर ऐनवेळी परीक्षा केंद्र शोधण्याची वेळ आली, असा आरोप शिक्षक संघटनांंनी केला आहे.
पुणे विभागीय मंडळाने शहरातील काही परीक्षा केंद्रांना त्यांच्या क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी दिले. त्यामुळे मुख्य परीक्षा केंद्रांनी अधिक झालेल्या विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था उपकेंद्रांवर केली. विद्यार्थ्यांना याबाबतची कोणतीही कल्पना देण्यात आली नव्हती. प्रवेश पत्रावर (हॉल तिकीट) छापण्यात आलेल्या परीक्षा केंद्रांवरच विद्यार्थी पोहोचले. मात्र, केंद्र दुसरीकडे असल्याचे सांगितले गेले. काही विद्यार्थी परीक्षा सुरू झाल्यानंतर अर्ध्या तासाने परीक्षा केंद्रावर पोहोचल्याचे चित्रही दिसले. इंग्रजीच्या परीक्षाला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त होती. त्यामुळे काही विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र बदलण्यात आले. मात्र, सर्वच विषयांच्या पेपरसाठी केंद्र बदलणार नाही, असे पुणे विभागीय शिक्षण मंडळाचे सचिव बबन दहिफळे यांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
>४२ कॉपीबहाद्दरांवर कारवाई
राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर ४२ कॉपीबहाद्दरांवर कारवाई करण्यात आली. अमरावती विभागातील सर्वाधिक १६, नाशिक विभागात ११, पुणे विभागात १०, नागपूर विभागात ३ आणि लातूर विभागात १ विद्यार्थी गैरप्रकार करताना आढळून आला, असे राज्य मंडळातर्फे कळविण्यात आले आहे.
>पाथर्डीत दोन शिक्षकांवर कारवाई
अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथे पेपर सुरू झाल्यानंतर अवघ्या १० मिनिटांनीच प्रश्नप्रत्रिका चक्क झेरॉक्स सेंटरवर दिसली. पहिल्या १० मिनिटांत व्हॉट्सअॅपवर प्रश्नपत्रिका फिरू लागली. त्यानंतर झेरॉक्स सेंटरवरून उत्तरे शोधून कॉप्या पुरवण्याचे काम होत असल्याचे आढळून आले. दरम्यान, खरवंडी येथील केंद्रावर पथकाने पाच विद्यार्थ्यांसह दोन शिक्षकांवर कॉपीप्रकरणी कारवाई केली.