वीज दर कपातीचे ऊर्जामंत्र्यांचे संकेत
By Admin | Updated: January 13, 2015 01:22 IST2015-01-13T01:11:19+5:302015-01-13T01:22:17+5:30
विजेच्या उत्पादन खर्चात झालेली वाढ, वीज गळतीमुळे होत असलेले नुकसान यामुळे विजेच्या दरात वाढ झाली आहे. त्याचा भुर्दंड ग्राहकांवर बसतो आहे. वीज दर कमी करण्यासाठी आवयक असलेल्या

वीज दर कपातीचे ऊर्जामंत्र्यांचे संकेत
नियामक आयोगाकडे प्रस्ताव देणार
नागपूर : विजेच्या उत्पादन खर्चात झालेली वाढ, वीज गळतीमुळे होत असलेले नुकसान यामुळे विजेच्या दरात वाढ झाली आहे. त्याचा भुर्दंड ग्राहकांवर बसतो आहे. वीज दर कमी करण्यासाठी आवयक असलेल्या सर्व प्रक्रियेचे नियोजन करण्यासाठी येत्या २१,२२ व २३ जानेवारीला ऊर्जा खात्याच्या सर्व अधिकाऱ्यांची बैठक आायोजित केली आहे. यात राज्यातील उपलब्ध विजेचा आढावा घेण्यात येईल. त्यानंतर ३० जानेवारीपूर्वी वीज नियामक आयोगाकडे वीज दर कमी करण्यासंदर्भातील प्रस्ताव सादर केला जाईल, अशी माहिती ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
टिळक पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत बावनकुळे म्हणाले, वीज दर कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत. त्यासाठी नियोजन सुरू आहे. वीज दर कमी करण्यासाठी कोळशावर होणारा वाहतूक खर्च कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल. त्याचबरोबर वीज वितरण प्रक्रियेत होणारी वीज गळती कशी कमी करता येईल, याकडे विशेषत्वाने लक्ष देण्यात येत आहे. वेकोलिकडून पुरविल्या जाणाऱ्या कोळशाच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यात येणार आहे. तसेच वीज खरेदीसाठी व कोळशाच्या पुरवठ्यासाठी ओपन एक्सेस पॉलिसीच्या माध्यमातून खर्च कमी करण्याचा प्रयत्न आहे. आघाडी सरकारने १२ टक्के दराने कर्ज घेतले असून, त्यापेक्षाही कमी व्याज दराने कर्ज उपलब्ध कसे होईल, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सोलर पंपाचा प्रस्ताव मंत्रीमंडळापुढे
राज्य सरकारने शेतकऱ्यांना पाच लाख सोलर पंप देण्याची घोषणा केली होती. दहा हजार पंपचा प्रस्ताव केंद्र सरकारला दिला आहे. शेतकऱ्यांना कमी किंमतीत सोलर पंप मिळावे, यासाठी संपूर्ण प्रस्ताव ३० जानेवारीपूर्वी मंत्रिमंडळापुढे मांडण्यात येईल. यापुढे विजेच्या क्षेत्रात कुठल्याही विभागावर अन्याय होणार नाही, असेही ते म्हणाले.
गुणवत्तापूर्ण सोलर पॉलिसी आणणार: विजेची मागणी लक्षात घेता, सोलरद्वारे वीज निर्मितीचा सरकारचा प्रयत्न आहे. यासाठी गुणवत्तापूर्ण सोलर पॉलिसी तयार करण्यात येत आहे. मेडासुद्धा यासाठी कार्यरत आहे. सोलरद्वारे निर्माण झालेली वीज ग्रीडमधून वितरित न करता, आॅफ ग्रीड त्याचा उपयोग करण्यावर भर राहणार आहे. तयार होणारी सोलर पॉलिसी देशातील सर्वात गुणवत्तेची ओळखल्या जाईल, असा दावा बावनकुळे यांनी केला.