शिक्षक बदल्यांचा गोंधळ संपेना

By Admin | Updated: May 19, 2016 01:33 IST2016-05-19T01:33:11+5:302016-05-19T01:33:11+5:30

जिल्ह्यांतर्गत आॅनलाइन शिक्षक बदलीतील गोंधळ सुरूच

Ending teacher confusion | शिक्षक बदल्यांचा गोंधळ संपेना

शिक्षक बदल्यांचा गोंधळ संपेना


पुणे : जिल्ह्यांतर्गत आॅनलाइन शिक्षक बदलीतील गोंधळ सुरूच आहे. शिक्षण विभागाच्या यादीतील चुकांमुळे दुसऱ्यांदा बदलीसाठी मुदतवाढ देण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. बदली प्रक्रियेत पारदर्शकता राहावी व शासनाने मुदत वाढवून दिल्याने मुदतवाढ देत असल्याचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण समितीचे अध्यक्ष शुक्राचार्य वांजळे यांनी सांगितले.
यानुसार आता २७ व २८ मे रोजी ही प्रक्रिया राबविण्यात येईल. जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या १० टक्के जिल्ह्यांतर्गत प्रशासकीय बदल्यांना राज्य सरकाने परवानगी दिली आहे. त्यामध्ये प्रशासकीय व विनंती बदल्यांचा समावेश आहे. त्यानुसार इतर संवर्गातील बदल्या सुरळीत पूर्ण झाल्या आहेत. शिक्षक व ग्रामसेवक या महत्त्वाच्या बदल्या बाकी आहेत. सामान्य प्रशासनाने बदल्यांच्या ठरविलेल्या वेळापत्रकानुसार १२ मेपासून ही बदल्यांची प्रक्र्रिया राबविण्याचे ठरविले होते. शुक्रवारी, १३ मे रोजी २० बदल्यांसाठी ९१ शिक्षकांना बोलावण्यात आले. प्रत्यक्षात १ हजार शिक्षक उपस्थित राहिले; त्यामुळे गोंधळ उडाला. अखेर जिल्हा परिषद अध्यक्षांनी लक्ष घालून या बदल्या थांबविल्या व नवे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार २० व २१ रोजी नव्याने प्रक्रिया राबविण्याचे ठरले होते. यानुसार शिक्षण विभागाने गटशिक्षणाधिकाऱ्यांना तीन दिवस शिक्षकांची सेवाज्येष्ठता यादी तयार करण्यास वेळ दिला. मात्र, बुधवार (१८ मे) पर्यंत काही तालुक्यांच्या याद्या आल्या व काही तालुक्यांच्या आल्याच नाहीत. (प्रतिनिधी)
>समायोजनही पुन्हा करण्याची वेळ
आॅनलाइन शिक्षक संचमान्यतेनुसार तालुक्यानुसार शिक्षकांचे गेल्या आठवड्यात समायोजन करण्यात आले होते. मात्र, हे समायोजन झाल्यानंतर शासनाने पटसंख्येऐवजी शाळाखोल्यांच्या संख्येवर शिक्षक निर्धारित अशी दुरुस्ती केली; त्यामुळे जिल्ह्यात ६७ शिक्षक वाढले आहेत. यामुळे शिक्षक अतिरिक्त झाल्याने त्याला दुसरी शाळा देण्यात आली. आता त्याच शाळेत शिक्षक जागा रिक्त झाल्याचे काही शाळांत प्रकार झाले आहेत. त्यामुळे हे समायोजन पुन्हा करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. तालुकास्तरावर या अडचणी पहिल्यांदा सोडवाव्यात, असे आदेश गटशिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
>जिल्हा परिषद शाळांत ११ हजार ४४३ एकूण शिक्षक असून, त्यांतील १० वर्षे सेवा पूर्ण झालेले ५ हजार २२१ शिक्षक बदलीला पात्र आहेत. यात ४ हजार ८१२ शिक्षक बिगरआदिवासी व ४०९ शिक्षक आदिवासी भागातील आहेत.
>शिक्षक सेवाज्येष्ठता यादी ही मॅन्युअल पद्धतीने केली जाते. यासाठी कोणतीही संगणकप्रणाली नाही. त्यामुळे यादीत काही चुका होत आहेत.
- मुश्ताक शेख, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

Web Title: Ending teacher confusion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.