लढवय्या कॉम्रेडची अखेर
By Admin | Updated: February 21, 2015 04:15 IST2015-02-21T04:15:13+5:302015-02-21T04:15:13+5:30
कम्युनिस्ट नेते अॅड. गोविंद पानसरे (८१) यांची गेल्या पाच दिवसांपासून मृत्युशी सुरू असलेली झुंज शुक्रवारी रात्री १०.४५ वाजता थांबली.

लढवय्या कॉम्रेडची अखेर
गोविंद पानसरे कालवश : मृत्युशी सुरू असलेली झुंज संपली
मुंबई : महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीतील अग्रणी नेते, गोरगरीब, श्रमिक-कष्टकरी व कामगारांचे पुढारी तसेच कम्युनिस्ट नेते अॅड. गोविंद पानसरे (८१) यांची गेल्या पाच दिवसांपासून मृत्युशी सुरू असलेली झुंज शुक्रवारी रात्री १०.४५ वाजता थांबली. फुफ्फुसात अतिरक्तस्त्राव झाल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. कॉम्रेड पानसरे यांच्या पार्थिवाचे रात्री उशिरा जेजे हॉस्पिटलमध्ये पोस्टमॉर्टेम झाले. त्यांचे पार्थिव शनिवारी साडेदहा वाजता त्यांचे पार्थिव कोल्हापूर येथे एअर एॅम्ब्युलन्सने नेण्यात येणार आहे.
१६ फेब्रुवारी रोजी कोल्हापूरमध्ये त्यांच्यावर गोळीबार झाला होता. त्यांच्यावर कोल्हापूरमध्ये उपचार सुरु होते. शुक्रवारी संध्याकाळी त्यांना अधिक उपचारासाठी मुंबईत ब्रीच कॅन्डी रुग्णालयात हलवण्यात आले. डॉ. फारुख उदवाडिया यांच्यासह चार जणांच्या टीमने शेवटपर्यंत त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पण त्यांना यश आले नाही. (प्रतिनिधी)
डॉक्टरांचे अथक प्रयत्न, पण...
च्कोल्हापुरातून पानसरे यांना सायंकाळी मुंबईत आणण्यात आले होते. ब्रीच कॅण्डी इस्पितळात त्यांच्यावर उपचार सुरु होते. साडेनऊ वाजेपर्यंत त्यांची प्रकृती चिंताजनक पण स्थिर होती.
च्९.४५ च्या सुमारास फुफ्फुसात अतिरक्तस्त्राव सुरु झाला. त्यानंतर त्यांना कृत्रिम श्वासनलिका देण्यात आली.
च्डॉक्टरांच्या टीमने सुमारे तासभर त्यांना वाचवण्यासाठी अथक प्रयत्न केले. पण रक्तदाब कमी होत जाऊन पावणेअकराच्या सुमारास त्यांचे हृदय बंद पडले आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मारेकरी मोकाटच
हल्ल्यानंतर फरार झालेल्या मारेकऱ्यांना पकडण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही.
गोरगरिबांना आधार देणारे अण्णा गेले
च्सोमवारी १६ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास मोटारसायकलवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी पानसरे व त्यांच्या पत्नी उमा (६७) यांच्यावर गोळीबार केला होता.
च्पानसरे यांच्यावरील हल्ल्यानंतर महाराष्ट्र हादरला होता. त्यांच्या निधनाचे वृत्त येताच कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य जनतेलाही हुंदका अनावर झाला. ‘गोरगरिबांना आधार देणारे अण्णा गेले,’ असा टाहो त्यांनी फोडला.
रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, डॉ. तात्याराव लहाने, सुप्रिया सुळे, रामदास आठवले, जितेंद्र आव्हाड यांनी ब्रीच कॅन्डी येथे भेट देऊन कॉम्रेड पानसरे यांचे अंतिम दर्शन घेतले. डॉ. लहाने यांनी कॉम्रेड पानसरेंच्या निधनाची माहिती दिली.