विहिरीत पडून चिमुकल्याचा अंत
By Admin | Updated: December 28, 2014 01:31 IST2014-12-28T01:31:01+5:302014-12-28T01:31:01+5:30
अंगणात खेळता खेळता जवळच असलेल्या विहिरीत तोल जाऊन पाण्यात पडल्याने पाचवर्षीय चिमुकल्याचा करूण अंत झाला.

विहिरीत पडून चिमुकल्याचा अंत
राहुरी (जि़ अहमदनगर) : अंगणात खेळता खेळता जवळच असलेल्या विहिरीत तोल जाऊन पाण्यात पडल्याने पाचवर्षीय चिमुकल्याचा करूण अंत झाला. शुक्रवारी संध्याकाळी सातच्या सुमारास ही ह्रदयद्रावक घटना घडली. तब्बल सोळा तासांच्या प्रयत्नानंतर मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.
डावखर मळा येथे अशोक खेमनर यांचे घर आहे. घरापासून जवळच नितीन डावखर व कुमार डावखर यांची विहीर आहे. शुक्रवारी संध्याकाळी सातच्या सुमारास खेमनर यांचा मुलगा महेश (५) हा आईचा मोबाईल घेऊन अंगणात खेळत होता. परंतु खेळताखेळता तो विहिरीकडे कसा गेला कोणालाच समजले नाही. अचानक तोल गेल्याने अशोक विहिरीत पडला. बराच वेळ झाला तरी अशोक घरी न परतल्याने आईने शोधाशोध सुरू केली. दरम्यान, जवळच्याच मिरा गायकवाड व उषा गायकवाड यांनी तो विहीरीत पडताना पाहिले. त्यांनी आरडाओरड केल्याने वस्तीवरील सुमारे शंभर लोकांचा जमाव जमा झाला. पोटचा गोळा विहिरीत बुडाल्याचे ऐकून चिमुकल्याची आई मंदा हिची शुद्धच हरपली.
स्थानिक तरूणांनी पटापट पाण्यात उड्या घेऊन अशोकला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु तोपर्यंत तो बुडाला होता. विहिरीला सुमारे सात ते आठ पुरुष पाणी असल्याने पोहोणाऱ्यांनाही मर्यादा येत होत्या. लागलीच काही जणांनी पाणी उपसण्याचा निर्णय घेतला. प्रथम दोन व नंतर चार अश्वशक्तीच्या पंपाने पाणी बाहेर काढण्याचे काम सुरू झाले. रात्री दहा वाजेपर्यंत हे प्रयत्न सुरू होते. परंतु पाणी जास्त असल्याने व अंधार झाल्याने त्यात अपयश येत होते. त्यामुळे सकाळी मृतदेह बाहेर काढण्याचा निर्णय तरूणांनी घेतला.
दरम्यान, चिमुकल्याच्या आईचा आक्रोश उपस्थितांची ह्रदये पिळवटून टाकणारा होता. तासाभरापूर्वी नजरेसमोर खेळणारा आपला चिमुकला अचानक बेपत्ता झाल्याने ती बेफान झाली होती. रात्रभर हे कुटुंब मुलाच्या विरहाने व्याकुळ झाले होते.
शनिवारी भल्या सकाळीच बारागाव नांदूर येथून भारत बर्डे व सुनील बर्डे या दोघा पट्टीच्या पोहोणाऱ्यांना पाचारण करण्यात आले. दुसरीकडे पाणी उपसण्याचे काम सुरू होते. बर्डे बंधूंचाही बराच वेळ मृतहेद काढण्याचा प्रयत्न सुरू होता. शेवटी अकरा वाजता सुनील बर्डेने घेतलेल्या एका दीर्घ बुडीत अशोकचा मृतहेद हाताला लागला. त्याने मृतदेह बाहेर काढताच खेमनर कुटुंबाने हंबरडा फोडला. (प्रतिनिधी)