तीन प्रभाग समितींत अखेर कमळ फुलले
By Admin | Updated: April 30, 2016 03:11 IST2016-04-30T03:11:57+5:302016-04-30T03:11:57+5:30
पालिकेच्या सहा प्रभाग समिती सभापतीपदासाठी शुक्रवारी झाली. त्यात प्रभाग समिती क्रमांक २, ४ व ६ मध्ये कमळ फुलले तर तीनमध्ये ठरल्याप्रमाणे शिवसेना विजयी झाली.

तीन प्रभाग समितींत अखेर कमळ फुलले
भार्इंदर : पालिकेच्या सहा प्रभाग समिती सभापतीपदासाठी शुक्रवारी झाली. त्यात प्रभाग समिती क्रमांक २, ४ व ६ मध्ये कमळ फुलले तर तीनमध्ये ठरल्याप्रमाणे शिवसेना विजयी झाली. प्रभाग एकमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार जिंकला.
प्रभाग समिती एकसाठी राष्ट्रवादीचे आसिफ शेख यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर करण्यात आले. समिती दोनमध्ये राष्ट्रवादीचे सुरेश खंडेलवाल व भाजपाचे डॉ. रमेश जैन यांनी उमेदवारी दाखल केल्याने त्यात डॉ. जैन यांची बहुमताने निवड झाली. समिती तीनचे सभापतीपद यंदाही शिवसेनेला देण्याची तडजोड भाजपा-सेनमध्ये झाल्याने सेनेच्या उमेदवार नीलम ढवण विजयी झाल्या. परंतु, ऐनवेळी हे पद भाजपाला देण्यावर तडजोड झाली. भाजपाने तसा पक्षादेश काढून पक्षाचे उमेदवार यशवंत कांगणे यांना मतदान करण्याचे निर्देश दिले. परंतु, निवडणुकीच्या काही तासअगोदर २०१४ प्रमाणेच जागा वाटप करण्याचे ठरविण्यात आले. त्याची कल्पना कांगणे यांना न दिल्याने त्यांनी उमेदवारी मागे घेण्यास नकार दिला. त्यामुळे सेनेच्या उमेदवार ढवण यांच्यासह भाजपाचे जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे, गटनेता शरद पाटील, माजी सभापती राकेश शहा यांची कांगणे यांना फोनाफोनी सुरु झाली. त्यालाही कांगणे यांनी प्रतिसाद न दिल्याने अखेर आमदार नरेंद्र मेहता यांनी कांगणे यांना उमेदवारी मागे घेण्याचे आदेश दिल्याने ढवण यांच्यासह भाजपा पदाधिकाऱ्यांचा जीव भांड्यात पडला. कांगणे यांनी उमेदवारी मागे घेतल्यानंतर सभागृहातून निघून गेल्या. ढवण यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली. (प्रतिनिधी)