अफू लागवड करणा-या २५ शेतकऱ्यांना सक्तमजुरी
By Admin | Updated: April 8, 2015 01:35 IST2015-04-08T01:35:43+5:302015-04-08T01:35:43+5:30
परळी तालुक्यात बेकायदेशीरपणे अफू लागवड केल्याप्रकरणी २५ शेतकऱ्यांना दोषी ठरवत सोमवारी जिल्हा व सत्र न्यायालयाचे अंबाजोगाईतील

अफू लागवड करणा-या २५ शेतकऱ्यांना सक्तमजुरी
अंबाजोगाई (जि़ बीड) : परळी तालुक्यात बेकायदेशीरपणे अफू लागवड केल्याप्रकरणी २५ शेतकऱ्यांना दोषी ठरवत सोमवारी जिल्हा व सत्र न्यायालयाचे अंबाजोगाईतील तिसरे अपर व सत्र न्या. एन.एस. कोल्हे यांनी दहा वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी १ लाख रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. तर १३ शेतकऱ्यांची निर्दोष मुक्त केले़ २०१२ मध्ये अफू शेतीचे प्रकरण उघडकीस आले होते. राज्यभर गाजलेल्या या प्रकरणात अडकलेले शेतकरी अनेक दिवस तुरुंगात होते. अफूप्रकरणी एकाच वेळी इतक्या शेतकऱ्यांना शिक्षा होण्याची ही पहिलीच घटना आहे.
शिक्षा सुनावण्यात आलेल्यांमध्ये सुरेश शेप, पांडुरंग शेप, संभाजी शिंदे, बालासाहेब शिंदे, आत्माराम शेप, उद्धव मोरे, मधुकर शेप, भास्कर शेप, उद्धव देशमुख, सदाशिव थावरे, ज्ञानोबा मोरे, नवनाथ थावरे, भीमराव शिंदे, विष्णू शिंदे, शेख पाशु शेख महेबुब, भीमराव राठोड, दिना राठोड, लाला निंबाळकर, भगवान शिंदे, बिभिषण शेप, हरिभाऊ कोकाटे, सुरेश नेमा राठोड, शिवाजी राठोड, चंद्रसेन थावरे, बापू थावरे यांचा समावेश आहे़
परळी तालुक्यातील मोहा, वंजारवाडी, घोलपतांडा येथे ३९ शेतकऱ्यांनी २६ एकर दोन गुंठे शेतजमिनीत बेकायदेशीरपणे अफुची लागवड केली होती. हा प्रकार सिरसाळा पोलिसांना माहित झाल्याने २४ फेब्रुवारी २०१२ रोजी पोलिसांनी कारवाई करून २७ हजार ७७० किलोग्रॅम अफुचे ओले पीक जप्त केले. याची किंमत एक कोटी ३६ लाख रुपये होती.सिरसाळाचे तत्कालीन पोलीस निरीक्षक लक्ष्मण विठ्ठल मंकावार यांच्या फिर्यादीवरून ३९ शेतकऱ्यांविरूद्ध गुन्हा नोंद झाला. पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने २५ जणांना दोषी ठरवले. यातील कायम फरार राहिलेला व्यापारी सुकविंदरसिंह दर्शनसिंग धिल्लो या घटनेपासून आजतागायत फरार आहे. (वार्ताहर)