कर्मचारी अजून निवडणूक कामात
By Admin | Updated: November 8, 2014 04:02 IST2014-11-08T04:02:16+5:302014-11-08T04:02:16+5:30
निवडणुकीचा निकाल लागून राज्याच्या नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधीही झाला़ तरी पालिकेचे कर्मचारी अद्याप स्वगृही परतलेले नाहीत़

कर्मचारी अजून निवडणूक कामात
मुंबई : निवडणुकीचा निकाल लागून राज्याच्या नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधीही झाला़ तरी पालिकेचे कर्मचारी अद्याप स्वगृही परतलेले नाहीत़ याचा फटका नागरी सेवांना बसत असल्याने विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी गेलेल्या अशा ४ हजार कामगारांना मुक्त करण्याची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली आहे़
विधानसभा निवडणुकीच्या कामात पालिकेचे ६ हजारांहून अधिक कर्मचारी-अधिकारी गुंतले होते़ अभियंता, शिक्षक, टेक्निशियन, अधिकारीवर्ग निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने महत्त्वाच्या खात्यांचे कामकाज गेले महिनाभर रखडले होते़ मात्र निवडणूक हे राष्ट्रीय काम असल्याने पालिकेने निमूट आपला कर्मचारीवर्ग वॉर्डावॉर्डातून दिला होता़ मात्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून पंधरवडा उलटला तरी निम्म्याहून अधिक कर्मचारी अद्याप परतलेले नाहीत़
याचा फटका प्रामुख्याने आरोग्य खाते, मालमत्ता कर, पर्जन्य जलवाहिन्या आदी विभागांच्या दैनंदिन कामकाजाला बसला आहे़ त्यामुळे निवडणुकीचे काम आटोपले असल्याने सर्व पालिका कर्मचाऱ्यांना ड्युटीतून मोकळे करण्याची मागणी प्रशासनाने शहर व उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली आहे़
आणखी महिनाभराची प्रतीक्षा
निवडणुकीचा निकाल लागला तरी अद्याप निवडणूक आयोगाचे काम संपलेले नाही़ तरी बऱ्याच कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामातून मुक्त करण्यात आले असून, काही ठरावीक चमूलाच ठेवण्यात आले आहे़ निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांच्या खर्चाची बेरीज लागल्यानंतरच उर्वरित कर्मचारी सोडण्यात येतील़ यास महिनाभराचा कालावधी लागण्याची शक्यता असल्याचे समजते़ (प्रतिनिधी)