विरोधी पक्ष नेतेपदाच्या शर्यतीला जोर
By Admin | Updated: December 8, 2014 02:20 IST2014-12-08T02:20:27+5:302014-12-08T02:20:27+5:30
विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना रस असल्याचे त्यांनी रविवारी सायंकाळी केलेल्या वक्तव्यावरून दिसून आले

विरोधी पक्ष नेतेपदाच्या शर्यतीला जोर
नागपूर : विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना रस असल्याचे त्यांनी रविवारी सायंकाळी केलेल्या वक्तव्यावरून दिसून आले. पक्षातील सर्वांनी संमती दिली तर मी ही नेता होऊ शकतो, असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे इच्छा व्यक्त केली. मात्र तातडीने त्यावर सारवासारवकरण्याचा प्रयत्नही केला.
पवार म्हणाले, विरोधकांमध्ये कुठलीही फूट नाही. फक्त विरोधी पक्षनेतेपदाच्या मुद्यावरच मतभेद होऊ शकतात. विधानसभेत राष्ट्रवादीचे ४१ व काँग्रेसचे ४२ सदस्य आहेत. आ. हितेंद्र ठाकूर व रवी राणा यांना निवडणुकीत राष्ट्रवादीने समर्थन दिले होते. शेकापचे गणपतराव देशमुख यांच्याशी माझी चर्चा झाली आहे.
या सर्वांचे राष्ट्रवादीला समर्थन आहे. त्यांच्या समर्थनाचे पत्र देणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गटाचे संख्याबळ ४५ हून अधिक झाले आहे. सोमवारी सकाळी राष्ट्रवादीचे सर्व प्रमुख नेते विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांची भेट घेऊन विरोधी पक्षनेतेपदाचा दावा सादर करतील. यानंतर कुणाचा दावा मान्य करायचा, याचा चेंडू अध्यक्षांच्या कोर्टात राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी नेत्याची निवड केली जाईल. त्यानंतर सभापती शिवाजीराव देशमुख यांची भेट घेऊन त्यांच्याकडे नाव सोपवू, असेही पवार म्हणाले. (प्रतिनिधी)