काश्मिरात संतापाचा पूर
By Admin | Updated: September 11, 2014 09:21 IST2014-09-11T03:36:20+5:302014-09-11T09:21:58+5:30
जम्मू-काश्मिरातील महापुराने हाहाकार माजला असतानाच लष्कराचे एक हजार जवान व त्यांची कुटुंबे राज्यातील विविध छावण्यांमध्ये अन्नपाण्याविना अडकून पडली

काश्मिरात संतापाचा पूर
श्रीनगर : जम्मू-काश्मिरातील महापुराने हाहाकार माजला असतानाच लष्कराचे एक हजार जवान व त्यांची कुटुंबे राज्यातील विविध छावण्यांमध्ये अन्नपाण्याविना अडकून पडली आहेत.पुरामुळे सर्वाधिक प्रभावित श्रीनगरमध्ये जलस्तरात घट झाली असली तरी अद्यापही चार लाख लोक मदतीच्या प्रतीक्षेत आहेत़ पूरप्रभावित भागात फसलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी लष्करी जवानांनी शर्थीचे प्रयत्न चालविले आहेत. मात्र अद्यापही अनेक भागांत मदत पोहोचू शकलेली नाही़ अन्नपाण्यासाठी लोक याचना करीत आहेत़ त्यामुळे लोकांमध्ये संतापाचाही महापूर पाहायला मिळत आहे़
लष्कराच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ८० हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचविण्यात आले, पण अद्याप स्थिती गंभीर आहे़ दक्षिण काश्मीर आणि श्रीनगरस्थित लष्कराच्या अनेक छावण्यांमध्ये पाणी शिरले आहे़ यामुळे एक हजारपेक्षा अधिक जवान आणि त्यांचे कुटुंबीय अन्नपाण्याविना येथे अडकून पडलेले आहेत़ पाणी, वीजपुरवठा आणि अन्य सेवा प्रभावित झाल्या आहेत़ मध्य आणि दक्षिण काश्मीर सीमांवरील २० पेक्षा अधिक लहानमोठ्या लष्करी छावण्या पुरामुळे प्रभावित झाल्या आहेत. ८ सप्टेंबरला काश्मीरच्या बादामी बाग छावणीस्थित लष्करी मुख्यालयात अडकलेले १,४०० जवान व त्यांच्या कुटुंबीयांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले होते़ जलस्तर घटला, मात्र झेलम नदीच्या आजूबाजूच्या भागात अद्यापही पूर ओसरलेला नाही़