दारूवरील करवाढीने मंत्र्यांत जुंपली!
By Admin | Updated: October 1, 2015 03:34 IST2015-10-01T03:34:11+5:302015-10-01T03:34:11+5:30
राज्याची आर्थिक परिस्थिती पूर्वपदावर आणण्याकरिता दारूवरील करवाढीच्या प्रस्तावावरून मंत्रिमंडळाच्या बैठकीत दोन ज्येष्ठ मंत्र्यांमध्ये चांगलीच जुंपली.

दारूवरील करवाढीने मंत्र्यांत जुंपली!
मुंबई : राज्याची आर्थिक परिस्थिती पूर्वपदावर आणण्याकरिता दारूवरील करवाढीच्या प्रस्तावावरून मंत्रिमंडळाच्या बैठकीत दोन ज्येष्ठ मंत्र्यांमध्ये चांगलीच जुंपली. उत्पन्न वाढीकरिता प्रत्येकवेळी दारूवर करवाढ करणे आपल्याला मान्य नाही, असे सांगत उत्पादन शुल्क खात्याचे मंत्री एकनाथ खडसे यांनी आपला आक्षेप नोंदविला, तर या करवाढीमुळे लोक कमी दारू प्यायले तर काही बिघडत नाही. उलट मायभगिनींचा दुवाच लाभेल, असे जोरदार प्रत्युत्तर वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्याचे समजते.
सरकारची तिजोरी भरून काढण्याकरिता दारूवर करवाढ करण्याचा प्रस्ताव मुनगंटीवार यांनी मंत्रिमंडळ बैठकीत मांडताच खडसे यांनी त्याला आक्षेप घेतला. शेजारच्या राज्यातील दारूचे दर आणि महाराष्ट्रातील दर याचा सारासार विचार करून करवाढ केली पाहिजे. दारू पिण्याचे समर्थन आपण कधीच केले नाही आणि करीतही नाही. परंतु सरकारच्या अशा धोरणामुळे अवैध दारूची विक्री वाढेल. त्याच्या परिणामांचाही विचार व्हायला हवा, असे खडसे म्हणाल्याचे समजते. खडसे यांच्या या वक्तव्याला मुनगंटीवार यांनी विरोध केला. आपण तर संपूर्ण दारूबंदीच्या मताचे आहोत. दुष्काळग्रस्तांना दिलासा द्यायचा तर लागणारे पैसे कुठून आणायचे? दारु पिणे ही चैन आहे. त्यामुळे दारु पिणाऱ्यांवर थोडा भार पडला किंवा दरवाढीमुळे लोक कमी दारु प्यायला लागले तर काही बिघडत नाही, अशा शब्दांत मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिल्याचे कळते. अवैध दारूचा सुळसुळाट रोखणे ही सरकारची जबाबदारी आहे. करवाढ केल्याने अवैध दारूचा पुरवठा वाढेल असा बागुलबोवा दाखवणे योग्य नाही, असेही मुनगंटीवार यांचे म्हणणे होते.
राज्य मंत्रिमंडळातील भाजपा व शिवसेनेच्या मंत्र्यांनीही खडसे यांच्या भूमिकेला विरोध करीत दारुवरील करवाढीचे समर्थन केल्याने खडसे यांचा नाईलाज झाला. शिवाय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही खडसे यांच्या भूमिकेशी असहमती व्यक्त करीत प्रस्ताव मंजूर करवून घेतला. (विशेष प्रतिनिधी)
----------
वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार दारू विक्रीबंदीचे खंदे समर्थक आहेत. त्यांच्या पुढाकारातूनच चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी झाली. आता यवतमाळ जिल्ह्यातही दारुविक्री बंदीची मागणी होत आहे. दारुविक्रीवरील करवाढ करून मुनगंटीवार यांनी आपला इरादा आणखी पक्का केला.