इमान अहमदला सैफी रुग्णालयातून डिस्चार्ज
By Admin | Updated: May 4, 2017 13:46 IST2017-05-04T13:24:08+5:302017-05-04T13:46:27+5:30
चर्नीरोड येथील सैफी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या आणि जगातील सर्वांत लठ्ठ महिला अशी ओळख असलेल्या इजिप्तच्या इमान अहमदला गुरुवारी डिस्चार्ज देण्यात आला.

इमान अहमदला सैफी रुग्णालयातून डिस्चार्ज
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 04 - चर्नीरोड येथील सैफी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या आणि जगातील सर्वांत लठ्ठ महिला अशी ओळख असलेल्या इजिप्तच्या इमान अहमदला गुरुवारी डिस्चार्ज देण्यात आला.
उपचारांकरिता मुंबईतील सैफी रुग्णालयात आलेल्या इमानचे वजन आता 176 किलो एवढे झाले आहे. यापुढील उपचारांसाठी इमान अबुधाबी येथील बर्जिल रुग्णालयात दाखल होणार आहे. इमानला गुरुवारी सैफी रुग्णालयातून मुंबई विमानातळापर्यंत ग्रीन कॉरिडोरने नेण्यात आले. मुंबई पोलिसांनी खास तिच्यासाठी ग्रीन कॉरिडोरची व्यवस्था केली होती. इजिप्तसाठी पुढील प्रवास एअरबस-३००ने प्रवास करणार आहे. या प्रवासासाठी इमानच्या गरजेनुसार विशेष सोयी असलेली ही एअरबस असणार आहे. आज सायंकाळपर्यंत इमानला अबुधाबी येथील बर्जिल रुग्णालयात दाखल करण्यात येईल. इमानसोबत व्हीपीएस हेल्थकेअरच्या चमूमधील डॉक्टर्स, परिचारिका असणार आहेत. तसेच तिची बहीण शायमासुद्धा सोबत राहणार आहे.
दरम्यान, इमानला डिस्चार्ज दिल्यानंतर बहिण शायमाने इमानवर उपचार केल्याबद्दल सैफी रुग्णालयाचे आभार मानले. तसेच, अबुधाबी येथील रुग्णालयातील उपचारानंतर इमानला चालणेही शक्य होईल, असे शायमा म्हणाली.
याचबरोबर अबुधाबी येथील रुग्णालयातही इमानचे उपचार कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर)च्या माध्यमातून मोफत करण्यात येणार आहेत.