अतिरिक्त दरामुळे बेलापूर ते एलिफंटा फेरीबोट तोट्यात
By Admin | Updated: March 6, 2017 02:55 IST2017-03-06T02:55:22+5:302017-03-06T02:55:22+5:30
एलिफंटा लेण्यांना भेट देता यावी, यासाठी बेलापूर ते एलिफंटा ही प्रवासी फेरीबोट सेवा दोन वर्षांपूर्वी सुुरू करण्यात आली.

अतिरिक्त दरामुळे बेलापूर ते एलिफंटा फेरीबोट तोट्यात
प्राची सोनवणे,
नवी मुंबई- शहरातील जगप्रसिद्ध एलिफंटा लेण्यांना भेट देता यावी, यासाठी बेलापूर ते एलिफंटा ही प्रवासी फेरीबोट सेवा दोन वर्षांपूर्वी सुुरू करण्यात आली. सुरुवातीला प्रवासी तसेच पर्यटकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, गेल्या काही महिन्यांपासून या फेरीबोट सेवेला पुरेसा प्रतिसाद न मिळाल्याने आर्थिक नुकसान झाले आहे. या बोटीच्या देखभाल दुरुस्तीकरिता वर्षाला १५ ते २० लाख रुपये खर्च येतो तो खर्चदेखील परवडत नसल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली आहे.
नवी मुंबईच्या भूमिपुत्रांनी स्थापन केलेल्या हिंदजल प्रवासी वाहतूक सहकारी संस्थेच्या माध्यमातून ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, सुरुवातीला या प्रवासी फेरीबोट सेवेला सर्वच स्तरांतून विरोध करण्यात आला होता. त्यानंतर मात्र ही बोट सेवा सुरळीपणे सुरू करण्यात आली होती. काही महिन्यांपासून प्रवाशांची संख्या निश्चीत झाल्यावरच या बोटची फेरी केली जाते. अनेकदा प्रवासी नसल्याकारणाने कित्येक दिवस या बोटचा वापरही केला जात नाही. यामध्ये फक्त डिझेलचा खर्च निघत असल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली. सद्यस्थितीत या ठिकाणी १० कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नसल्याची खंत या वेळी व्यक्त करण्यात आली. अरबी समुद्रात वसलेल्या एलिफंटा लेणी किंवा घारापुरी लेणी पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येत असतात. मात्र, नवी मुंबईकरांना ही लेणी पाहायची असतील तर नवी मुंबईतून या ठिकाणी जाण्यासाठी काहीच साधन नव्हते. ही जलप्रवासाची सोय नवी मुंबई शहरवासीयांबरोबरच इतर सर्व पर्यटकांना उपलब्ध व्हावी, यासाठी हिंदजल प्रवासी वाहतूक सहकारी संस्थेने प्रवासी फेरीबोट सुरू करण्याचे ठरविले. त्यासाठी विविध शासकीय खाती, संस्था तसेच महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाची रीतसर परवानगी घेण्यात आल्याचेही प्रवासी वाहतूक संघाने स्पष्ट केले. २४ मेपासून ही फेरी बोटसेवा बंद होणार असून उन्हाळ््याच्या सुट्यांमध्ये पर्यटकांनी या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. इतर बोटसेवेपेक्षा ही फेरीबोट सेवा
वेगवान, सुखकर असल्याचा दावाही संस्थेच्या वतीने करण्यात आला आहे. प्रवासी सुरक्षेची पुरेपूर दक्षता घेतली जात असून, याकरिता लाइफ जॅकेट, पाण्याची खोली मोजणारी आधुनिक यंत्रणा, पाण्यावर तरंगणाऱ्या रिंग, जीपीएस प्रणाली अशा विविध सुविधा अद्ययावत करण्यात आल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली.
>अनेकदा प्रवासी नसल्याकारणाने कित्येक दिवस या बोटचा वापरही केला जात नाही. यामध्ये फक्त डिझेलचा खर्च निघत असल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली.
सद्यस्थितीत याठिकाणी १० कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नसल्याची खंत या वेळी व्यक्त करण्यात आली.
>न परवडणारा प्रवास
बेलापूर ते एलिफंटा प्रवासाकरिता सुरुवातील २८० रुपये मोजावे लागत असून यामध्ये वाढ झाली असून आता ४०० रुपये मोजावे लागतात.
हे तिकीट सर्वसामान्यांना परवडणारे नसल्याची तक्रार प्रवाशांनी केली. कित्येकदा ही फेरीबोट सेवा बंद असल्याने निराश होऊन परतावे लागत असल्याची प्रतिक्रिया पर्यटकांनी व्यक्त केली आहे.