शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय असतात. तसेच राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रश्नांबाबत आपलं परखड मत व्यक्त करत असतात. दरम्यान, प्रियंका चतुर्वेदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर मांडलेल्या एका पोस्टची दखल खुद्द टेस्लाचे प्रमुख एलन मस्क यांनी घेतली आहेत. तसेच प्रियंका चतुर्वेदी यांनी केलेल्या पोष्टवर आपली प्रतिक्रियाही दिली आहे.
त्याचं झालं असं की, एलन मस्क यांनी ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यांच्या पोस्टमुळे ब्रिटनमध्ये खळबळ उडाली होती. किर स्टार्मर यांनी दुर्बल मुलींवर बलात्कार करणाऱ्या टोळी प्रकरणी न्यायाने काम केलेलं नाही, असा आरोप मस्क यांनी केला होता. तसेच कथित ग्रुमिंग घोटाळ्याच्या सार्वजनिक चौकशीची मागणी मान्य न करता स्टार्मर यांना पाठीशी घालण्यात आल्याचा आरोप केला होता.
ग्रुमिंग गँग स्कँडल हा ब्रिटनच्या राजकारणात दीर्घकाळापासून वादाचा विषय राहिला आहे. रॉडरहॅम, रोशडेल आणि टेलफोर्डसारख्या शहारांमध्ये मोठ्या प्रमाणावर बाल लैंगिक शोषण केलं जात असल्याचं तसेच पाकिस्तानी वंशाचे पुरुष हे शोषण मुख्यत्वेकरून करत असल्याचं तपासामधून समोर आलं आहे. दरम्यान, एलन मस्क यांनी केलेल्या गौप्यस्फोटानंतर हा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर आशियाई देशांना लक्ष्य केले जाऊ लागले. त्या संदर्भातच प्रियंका चतुर्वेदी यांनी हे ट्विट केले आहे. त्यावर एलन मस्क यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
पाकिस्तान वगळता इतर आशियाई देशांचा बचाव करताना आपल्या ट्विटमध्ये प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या की, ती आशियाई ग्रुमिंग टोळी नाही आहे तर पाकिस्तानी ग्रुमिंग टोळी आहे. माझ्या या वाक्याचा पुनरुच्चार करा. एका दुष्ट राष्ट्रासाठी सर्व आशियाई लोकांना का दोषी ठरवलं जातंय? असा सवाल प्रियंका चतुर्वेदी यांनी विचारला आहे. त्यावर एलन मस्क यांनी आपली प्रतिक्रिया देताना ‘’तुमचं म्हणणं खरं आहे’’, असं उत्तर दिलं.