कलावंतांचा धारवाडात एल्गार
By Admin | Updated: November 29, 2015 02:15 IST2015-11-29T02:15:52+5:302015-11-29T02:15:52+5:30
ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर, अॅड. गोविंद पानसरे आणि डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येचा, तसेच देशातील वाढत्या असहिष्णुतेच्या निषेधार्थ साहित्यिक

कलावंतांचा धारवाडात एल्गार
धारवाड (कर्नाटक) : ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर, अॅड. गोविंद पानसरे आणि डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येचा, तसेच देशातील वाढत्या असहिष्णुतेच्या निषेधार्थ साहित्यिक, कलावंतांनी शुक्रवारी येथे केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार एल्गार पुकारला. त्यामध्ये शास्त्रज्ञदेखील सहभागी झाले होते.
३० जानेवारीला म्हणजेच महात्मा गाधीजींच्या स्मृतीदिनी ‘चलो दांडी’ कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि गोव्यातील सुमारे पन्नास विचारवंत सभेला उपस्थित होते. गोव्यातील साहित्य अकादमी पुरस्कार विजेते साहित्यिक दामोदर मावजो, दिलीप बोरकर सभेला उपस्थित होते. कलावंतांनी एम. एम. कलबुर्गी यांच्या निवासस्थानी भेट दिली. कलबुर्गी यांच्या नातेवाईकांजवळ असहिष्णुतेच्या विरोधातील भावना कलावंतांनी व्यक्त केल्या. शनिवारी एम. जी. कलबुर्गी यांचा स्मृतिदिन आहे. सर्व विचारवंत विद्यावर्धक संघाच्या सभागृहात जमले होते. भाषा संस्थेचे प्रमुख गणेश देवी यांनी मार्गदर्शन केले. त्यांनीच या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सभेपूर्वी त्यांनी पत्रकार परिषदेत ‘चलो दांडी’ कार्यक्रमाची घोषणा केली.
गणेश देवी म्हणाले, ‘गांधीजींनी ज्या गावातून मिठाच्या सत्याग्रहाचा प्रारंभ केला, तेथे असा कार्यक्रम राबवला जाईल. विचारवंतांच्या हत्या होत आहेत. अशावेळी सर्वांनी एकत्र येऊन असहिष्णुतेच्या विरोधात रस्त्यावर उतरले पाहिजे.’ (विशेष प्रतिनिधी)