मराठी साहित्यिकांचाही एल्गार
By Admin | Updated: October 14, 2015 04:24 IST2015-10-14T04:24:14+5:302015-10-14T04:24:14+5:30
देशातील वाढती असहिष्णुता, जातीय तणाव व हिंसक घटनांमुळे अस्वस्थ झालेल्या देशभरातील साहित्यविश्वातून निषेधाचे सूर उमटत असतानाच आता मराठी साहित्यविश्वातूनही एल्गार पुकारला गेला आहे

मराठी साहित्यिकांचाही एल्गार
मुंबई : देशातील वाढती असहिष्णुता, जातीय तणाव व हिंसक घटनांमुळे अस्वस्थ झालेल्या देशभरातील साहित्यविश्वातून निषेधाचे सूर उमटत असतानाच आता मराठी साहित्यविश्वातूनही एल्गार पुकारला गेला आहे. प्रसिद्ध लेखिका प्रज्ञा दया पवार यांच्यासह हरिश्चंद्र थोरात यांनी देशातील अघोषित आणीबाणीच्या निषेधार्थ राज्य सरकारचे सर्व पुरस्कार, पुरस्काराच्या रकमेसह परत केले असून, तसे त्यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळविले आहे. अनुवादक गणेश विसपुते आणि संजय भास्कर जोशी हेही पुरस्कार परत करणारांच्या रांगेत उभे आहेत.
डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यापाठोपाठ कर्नाटकातील विवेकवादी लेखक कलबुर्गी यांची झालेली हत्या आणि दादरी हत्याकांडाचा निषेध म्हणून आजवर २३ ज्येष्ठ साहित्यिकांनी आपले साहित्य अकादमीचे मानाचे पुरस्कार परत केले आहेत. (प्रतिनिधी)
आणीबाणीपेक्षाही सद्य:कालीन आणीबाणीची भीषणता अधिक तीव्र आहे. याचे कारण तेव्हा जनसामान्यांवर फक्त शासनाचीच करडी नजर होती. आता मात्र शासनरहित अगदी आपण जिथे राहतो, वावरतो, नोकरी-व्यवसाय करतो तिथपर्यंत आपल्यावर लक्ष ठेवणारे सत्ताधाऱ्यांचे पक्षसेवक दिसतात. शिक्षण, इतिहास, विज्ञान, कला-साहित्य आणि एकूणच सांस्कृतिक क्षेत्रात अपरिमित दंडेलशाही सुरू आहे.
- प्रज्ञा पवार, लेखिका
>>पद्मश्री किताब परत करणार
मंगळवारी कर्नाटकचे सुप्रसिद्ध साहित्यिक रहमत तरीकेरी यांनीही आपला साहित्य अकादमी पुरस्कार परत करण्याचा निर्णय जाहीर केला. पाठोपाठ पंजाबच्या नामवंत लेखिका दलीप कौर टिवाणा यांनीही आपला पद्मश्री किताब परत करण्याची घोषणा केली.
प्रज्ञा पवार यांनी सर्व सरकारी पुरस्कारांसह १ लाख १३ हजार रुपयांची पुरस्कारांची रक्कमही मुख्यमंत्र्यांना धनादेशाद्वारे पाठविली. हरिश्चंद्र थोरात यांनीही उत्कृष्ठ साहित्यनिर्मितीसाठी २००६ आणि २०११ साली मिळालेल्या पुरस्कारांचे ५२ हजार रुपये, मानचिन्हासह परत केले आहेत.