अकरावीचा कट आॅफ @ ९५!
By Admin | Updated: June 7, 2016 07:43 IST2016-06-07T07:43:08+5:302016-06-07T07:43:08+5:30
अकरावी प्रवेशासाठी यंदाचा पहिलाच कट आॅफ ९५ टक्क्यांपर्यंत स्थिरावण्याची शक्यता असून एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसमोर सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे आव्हान असणार

अकरावीचा कट आॅफ @ ९५!
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (दहावी) परीक्षेचा निकाल सोमवारी लागल्यानंतर अकरावी प्रवेशासाठी यंदाचा पहिलाच कट आॅफ ९५ टक्क्यांपर्यंत स्थिरावण्याची शक्यता असून एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसमोर सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे आव्हान असणार आहे. तसेच उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या तुलने जागा कमी पडण्याची भीती आहे.
कट आॅफमध्ये राज्य शिक्षण मंडळाचे विद्यार्थी मागे पडण्याची शक्यता आहे. कारण एकीकडे ९० टक्के मिळवणाऱ्या सीबीएसई आणि आयसीएसईच्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. तर दुसरीकडे राज्य शिक्षण मंडळातून ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत मात्र ७०० विद्यार्थ्यांनी घट झाली आहे. त्यामुळे नामांकित महाविद्यालयातील जागा सीबीएसई आणि आयसीएसईच्या विद्यार्थ्यांना मिळणार आहेत.
महत्त्वाची बाब म्हणजे मुंबई विभागीय मंडळातून यंदा एकूण २ लाख ९७ हजार ७१९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या पाहता हा आकडा ३ लाखांवर जातो. याउलट गेल्यावर्षी अकरावीच्या प्रवेशासाठी उपलब्ध जागांची संख्या २ लाख ६९ हजार १७२ इतकी असल्याचे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने सांगितले. म्हणजेच प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही उपलब्ध जागांहून अधिक असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया केवळ आॅनलाईन पद्धतीने होणार असून सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश कसा मिळणार? याबाबत प्रश्नचिन्ह आहे. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, यंदा प्रवेशांच्या जागांत काही प्रमाणात वाढ होणार आहे. त्यामुळे एकही विद्यार्थी प्रवेशाविना राहणार नाही. पालघरसह वसई आणि विरार जिल्ह्यात अकरावीसाठी काही हजार जागा उपलब्ध आहेत. (प्रतिनिधी)