अकरावीत ४८ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश
By Admin | Updated: July 11, 2017 00:23 IST2017-07-11T00:23:45+5:302017-07-11T00:23:45+5:30
उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांच्या अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी सोमवारी जाहीर करण्यात आली

अकरावीत ४८ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी/पुणे : केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीमार्फत राबविण्यात येत असलेल्या पुणे व पिंपरी-चिंचवडमधील सर्व उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांच्या अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी सोमवारी जाहीर करण्यात आली. मात्र, उद्योगनगरीत रात्री उशिरापर्यंत यादी न मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ सुरू होता.
पहिल्या फेरीत गुणवत्ता यादीनुसार ४८ हजार ३२४ विद्यार्थ्यांचा पहिल्या फेरीत प्रवेश मिळाला आहे. विद्यार्थ्यांना हवे असलेले महाविद्यालय व त्यांना मिळालेले गुण यांचे गणित न जुळल्याने १९ हजार ८०६ विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत राहिले आहेत. यंदा अकरावी प्रवेशासाठी ७८ हजार ४३८ विद्यार्थ्यांनी केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीकडे अर्ज केले होते. त्यापैकी १० हजार ३०८ विद्यार्थ्यांनी विविध कोट्याअंतर्गत प्रवेश घेतले आहेत. पहिल्या गुणवत्ता यादीत ४८ हजार ३२४ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला. पुणे व पिंपरी-चिंचवडमधील २६७ महाविद्यालयात अकरावी प्रवेशाच्या ९१ हजार ६७० जागा उपलब्ध आहेत. एकूण प्रवेश क्षमतेपेक्षा कमी विद्यार्थ्यांचे अर्ज समितीकडे आले आहेत. मात्र विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम भरून दिलेल्या महाविद्यालयाच्या गुणवत्ता यादीनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू न शकल्याने १९ हजार ८०६ विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. प्रवेश समितचीचे अध्यक्ष व शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर, सचिव मिनाक्षी राऊत यांनी याबाबतची माहिती दिली.
कला शाखेत ५ हजार ८४२, वाणिज्य शाखेत २१ हजार ०२५, विज्ञान शाखेत २० हजार ५५४, एमसीव्हिसीमध्ये ९०३ अशा ४८ हजार ३२४ विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झाला आहे. प्रवेशासाठी अर्ज केलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ७०.९३ टक्के विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळालेला आहे.
पहिल्या फेरीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना ११ ते १३ जुलै दरम्यान संबंधित महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यावा लागेल. पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना त्या महाविद्यालयात प्रवेश घेणे बंधनकारक असेल, त्याने प्रवेश न घेतल्यास तो या प्रक्रियेतून बाहेर पडणार आहे. दुसऱ्या, तिसऱ्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळालेले विद्यार्थी मात्र त्यांना हवे असलेल्या पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळण्यासाठी प्रतीक्षा करू शकतील.
प्रवेश समितीकडून १४ जुलै रोजी रिक्त जागांचा तपशील व पहिल्या फेरीतील महाविद्यालयांचा कटआॅफ जाहीर होणार आहे. त्यानंतर १५ जुलै पासून दुसरी फेरी राबविली जाणार आहे. अशा पद्धतीने प्रवेशाच्या ४ फेऱ्या पार पडणार आहेत.
।यांनी त्याच महाविद्यालयात : प्रवेश घेणे बंधनकारक
अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थींनी दिलेल्या पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय त्यांना गुणवत्ता यादीनुसार मिळाले असल्यास त्यांनी त्याच महाविद्यालयामध्ये प्रवेश घेणे बंधनकारक आहे. यंदा १९ हजार ९९१ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे.
या विद्यार्थ्यांनी जर संबंधित महाविद्यालयात प्रवेश घेतला
नाही तर ते प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडणार आहेत. दुसऱ्या व त्यापुढील पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळालेले विद्यार्थी मात्र पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळण्यासाठी पुढील फेऱ्यांमध्ये प्रतिक्षा करू शकणार आहेत.
२० हजार विद्यार्थ्यांना मिळाले हवे ते महाविद्यालय
अकरावी प्रवेशासाठी यंदा १९ हजार ९९१ विद्यार्थ्यांना त्यांना हवे असलेले महाविद्यालय (पहिल्या पसंतीक्रमाचे) मिळालेले आहे. त्यानंतर ८ हजार १३१ विद्यार्थ्यांना दुसऱ्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाले आहे. ५ हजार २१६ विद्यार्थ्यांना तिसऱ्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाले. यंदा विद्यार्थ्यांना १० महाविद्यालयांचे पसंतीक्रम देता येऊ शकत होते. १११३ विद्यार्थ्यांना दहाव्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाले आहे.
गुरुवारी ५ वाजेपर्यंत घ्यावा लागणार प्रवेश
अकरावी प्रवेशासाठी पहिल्या फेरीत ४८ हजार ३२४ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला आहे. त्यांनी संबंधित महाविद्यालयात जाऊन ११ ते १३ जुलै या कालावधीत प्रवेश घ्यावा लागणार आहे. गुरूवारी (१३ जुलै) संध्याकाळी ५ वाजेपर्यंत प्रवेश घेण्यासाठी वेळ उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रवेश समितीकडून १४ जुलै रोजी रिक्त पदांचा तपशील जाहीर केला जाणार आहे. त्यानंतर १५ जुलैपासून दुसऱ्या फेरीला सुरूवात होणार आहे.