पुरंदरमध्ये वीजबिल वाटपात गोंधळ

By Admin | Updated: April 30, 2016 01:01 IST2016-04-30T01:01:19+5:302016-04-30T01:01:19+5:30

अनेक त्रुटी असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. ही परिस्थिती शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातही आहे.

Electricity distribution gap in Purandar | पुरंदरमध्ये वीजबिल वाटपात गोंधळ

पुरंदरमध्ये वीजबिल वाटपात गोंधळ

सासवड : शहरासह पुरंदर तालुक्याच्या अनेक गावांत वीजबिल वाटपात गोंधळ असून, अनेक त्रुटी असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. ही परिस्थिती शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातही आहे. काही शेतकऱ्यांच्या घरी नव्याने बसविण्यात आलेले आधुनिक इलेक्ट्रॉनिक मीटर हे जास्त गतीने पळत असल्याने एका बल्बचे बिल महिन्याला तब्बल ३ ते ५ हजारांपर्यंत आल्याची उदाहरणे आहेत. याबाबत संबंधित अधिकऱ्यांना सांगितले असता मीटर बदलून देतो, असे सांगितले जाते. परंतु, त्यानंतरही भरमसाट वीजबिल आले तरीही मीटर बदलला जात नाही. अवाजवी वीजबिलामुळे सध्या दुष्काळात होरपळलेला शेतकरी आणखी अडचणीत येत आहे.
इमारतीमधील किंवा घराबाहेरील मीटरचा फोटो काढून त्यावर असलेल्या युनिटप्रमाणे बिल तयार केले जाते व ते ग्राहकापर्यंत पोहोचविले जाते, अशी पद्धत होती. परंतु, सध्या बहुतेक ठिकाणी वीजबिलावर मीटरचा फोटो नसतो. त्यामुळे वीजबिल अंदाजे तयार केले जाते. वीजबिल भरण्याची तारीख व बिल ग्राहकाला मिळाल्याची तारीख यांमध्ये किमान ८ दिवसांचे अंतर असल्यास ग्राहक वेळेवर बिल भरू शकतो. परंतु, बिल भरण्याच्या तारखेआधी एक-दोन दिवस किंवा बिल भरण्याच्या तारखेलाच बिल दिले जाते. त्यामुळे ग्राहकांना विनाकारण दंड भरावा लागतो. तसेच उशिरा बिल भरल्यामुळे पुढील महिन्याच्या बिलामध्ये मागील बिल वाढवून येते व हे बिल कमी करण्यासाठी विद्युत मंडळाच्या कार्यलयात जावे लागते.
यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. सासवड शहर विस्तारित होत असल्याने अनेक ठिकाणी वीजबिले मिळताच नाहीत; त्यामुळे नागरिकांना स्वत: विद्युत मंडळाच्या कार्यलयात जाऊन वीजबिल घ्यावे लागते.

Web Title: Electricity distribution gap in Purandar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.