नांदेडमध्ये वीज पडून दोघांचा मृत्यू
By Admin | Updated: June 9, 2017 20:55 IST2017-06-09T20:55:24+5:302017-06-09T20:55:24+5:30
देगलूर शहरासह ग्रामीण भागात शुक्रवारी सायंकाळी जोराचे वारे व विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली.

नांदेडमध्ये वीज पडून दोघांचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
देगलूर (जि. नांदेड) : देगलूर शहरासह ग्रामीण भागात शुक्रवारी सायंकाळी जोराचे वारे व विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. दरम्यान, रमतापूर (ता. देगलूर) शिवारात पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण करून घराकडे परतणाऱ्या दोन चुलतभावांवर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
गोपाळ पंढरीनाथ पाटील (वय ३०) व ज्ञानेश्वर शंकरराव पाटील (वय १५, दोघेही रा. रमतापूर) अशी मृत्युमुखी पडलेल्या दोन भावांची नावे आहेत. हे दोघे मशागतीची कामे पूर्ण करून घराकडे परतत होते. पैकी ज्ञानेश्वर हा शालेय शिक्षण घेत आहे. रमतापूरचे सरपंच नारायण पाटील, पोलिस पाटील ज्ञानोबा कोळनुरे यांनी ही माहिती दिली. शिवारातील काही लोकांनी दोघांनाही हणेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले़ परंतु वैद्यकीय अधिकारी डॉ. ओमप्रकाश कदम यांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. नायब तहसीलदार रघुनाथसिंह चव्हाण यांनी रमतापूर येथील घटनेव्यतिरिक्त अन्य कोठेही वीज पडून प्राणहानी झाली नसल्याचे सांगितले.
दरम्यान, देगलूर शहर व परिसरात सुमारे अर्धातास पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे सखल भागात पाणी साचले होते. नांदेड शहर व जिल्ह्याच्या इतर भागात शुक्रवारी पाऊस झाला नाही.
हिमायतनगरमध्ये दमदार पाऊस
हिमायतनगर शहर व परिसरात गुरुवारी सायंकाळच्या सुमारास दमदार पावसाने हजेरी लावली. सिबदरा, वडगाव, कार्ला, पिंछोडी, मंगळुरु, वारंग टाकळी, धानोरा, बोरगडी, बोरगडीतांडा, कौठातांडा आदी भागांत पाऊस झाल्याने शेतकऱ्यांतून आनंद व्यक्त होत आहे.