मिहानमधील गुंतवणूकदारांना सवलत दराने वीज
By Admin | Updated: June 14, 2014 05:01 IST2014-06-14T05:01:32+5:302014-06-14T05:01:32+5:30
नागपूरच्या महत्त्वाकांक्षी मिहान प्रकल्पांतर्गत उभारण्यात येत असलेल्या विशेष आर्थिक क्षेत्रात (एसईझेड) गुंतवणूक करणाऱ्यांना ३० ते ३५ टक्के सवलतीच्या दरात वीज उपलब्ध करून देण्यात येईल,

मिहानमधील गुंतवणूकदारांना सवलत दराने वीज
मुंबई : नागपूरच्या महत्त्वाकांक्षी मिहान प्रकल्पांतर्गत उभारण्यात येत असलेल्या विशेष आर्थिक क्षेत्रात (एसईझेड) गुंतवणूक करणाऱ्यांना ३० ते ३५ टक्के सवलतीच्या दरात वीज उपलब्ध करून देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी विधानसभेत केली.
ते म्हणाले की, यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (एमएडीसी) वीज खरेदी, पुरवठा व वितरणाची जबाबदारी घेणार आहे. याकरिता विमानतळ विकास कंपनी पारदर्शक व स्पर्धात्मक पद्धतीने पॉवर एक्सेंज किंवा शॉर्ट टेंडरद्वारे वीज खरेदी करेल. कंपनीकडे वीज वितरणाचा परवाना असल्यामुळे कंपनीने या मार्गाने वीज खरेदी करून मिहानमधील एसईझेड क्षेत्रातील गुंतवणूकधारकांना पुरवठा केल्यास महावितरणाच्या दरापेक्षा मिहानमधील उद्योगांना सुमारे ३० ते ३५ टक्के कमी दराने वीज मिळणार आहे. कारण त्यामध्ये प्रामुख्याने शेतीकरिता देण्याच्या क्रॉस सबसिडीचा समावेश नसेल.
एसईझेडमधील गुंतवणूकदारांना त्यामुळे निश्चितच दिलासा मिळणार आहे. सुरुवातीला वितरणाची कार्यवाही करण्यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीस महावितरणकडून आवश्यक तो कर्मचारीवर्ग व तांत्रिक मदत उपलब्ध करून देण्यात येत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)