वीज कोसळून राज्यात ५ ठार!
By Admin | Updated: April 11, 2015 02:07 IST2015-04-11T02:07:23+5:302015-04-11T02:07:23+5:30
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत शुक्रवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. तर राज्यात वीज कोसळून पाच जणांचा

वीज कोसळून राज्यात ५ ठार!
औरंगाबाद/पुणे/अकोला : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत शुक्रवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. तर राज्यात वीज कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला़ यामध्ये वाशिममध्ये दोघांचा, नांदेड, जालना आणि नगर जिल्ह्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे़ राज्यभर ढगाळ हवामान आणि अवकाळी पावसाच्या शक्यतेमुळे तापमानात मोठी घट नोंदवली गेली.
मराठवाड्यात सर्वच जिल्ह्यांत शुक्रवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. नांदेडमध्ये गारपिटीने तडाखा दिला. जालना, हिंगोली, बीड, परभणी आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांत झालेल्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यात गोटन गावात आंब्याच्या झाडावर वीज कोसळून रणजीत मरमठ (२२) हा जागीच ठार झाला. तर, चंदन राजीरवाल (२०), उमेश जगताप (२३) हे गंभीर भाजले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. नांदेडच्या नायगाव तालुक्यात शेतात कापूस वेचणी करताना सयाबाई किशन लांडगे (५६) ही ठार झाली़ अहमदनगर जिल्ह्यातील काही भागांत अवकाळी पावसासह गारपीट झाली़ पारनेर तालुक्यातील राळेगण थेरपाळ येथे शिवाजी डोमे (४५) यांचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला़
बुलडाणा आणि वाशिमला पावसाने झोडपले. बुलडाणा जिल्ह्यात काही ठिकाणी पावसासह गारपीट आणि वाशिम जिल्ह्यात जोरदार, तर अकोल्यात तुरळक पाऊस झाला. वाशिम जिल्ह्यात वीज कोसळून रामा लोणकर (१६) व विठ्ठल माधव तागड (१७) या दोघांचा मृत्यू झाला. सिंदखेडराजा तालुक्यातील काही भागांत वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला.
पुण्यात राजगुरूनगर भागात गारपिटीसह जोरदार पाऊस झाला. राज्यात सर्वाधिक ४०.८ अंश सेल्सिअस तापमान मालेगावमध्ये नोंदविले गेले. त्यापाठोपाठ अकोला, चंद्रपूर, वर्धा या शहरांचेच तापमान ४० अंशांवर होते. पुढील २४ तासांत मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात गारपिटीसह पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)