इलेक्ट्रिक बसमुळे ठामपाला दरमहा मिळणार १० लाखांचे उत्पन्न
By Admin | Updated: July 31, 2016 04:28 IST2016-07-31T04:28:59+5:302016-07-31T04:28:59+5:30
ठाणे पालिका परिवहन सेवेच्या विस्कळीत कारभारामुळे, बसच्या वाईट अवस्थेमुळे ठाणेकरांना चांगली सेवा उपलब्ध होऊ शकलेली नाही.

इलेक्ट्रिक बसमुळे ठामपाला दरमहा मिळणार १० लाखांचे उत्पन्न
ठाणे : ठाणे पालिका परिवहन सेवेच्या विस्कळीत कारभारामुळे, बसच्या वाईट अवस्थेमुळे ठाणेकरांना चांगली सेवा उपलब्ध होऊ शकलेली नाही. त्यावर मात करण्यासाठी आणि ठाणेकरांना उत्तम सेवा देण्यासाठी ठाणे महापालिका १०० इलेक्ट्रिक हायब्रीड बस घेणार आहे. पीपीपी तत्त्वावर या बस रस्त्यावर धावणार असल्या, तरी पालिकेला कोणताही खर्च न करता, उलट महिनाकाठी १०० बसपोटी १० लाखांचे उत्पन्न मिळणार आहे.
ठाणे पालिका परिवहन सेवेच्या (टीएमटी) ताफ्यात सध्या ३१३ बस असून, त्यातील १८० च्या आसपास बस प्रत्यक्षात रस्त्यावर धावत आहेत. त्यात नव्याने १९० बस खरेदी केल्या जाणार आहेत. त्यातील काही बस लवकरच ताफ्यात दाखल होतील. सध्या ठाणेकरांना इतर सेवांवर अवलंबून राहावे लागत आहे. ही समस्या लक्षात घेऊन ठाणेकरांसाठी सेमी लो फ्लोअर इलेक्ट्रिक हायब्रीड बस घेतल्या जाणार आहेत. त्या पीपीपी तत्त्वावर असून, त्याचा पालिकेला काहीही खर्च नाही. या प्रकारच्या १०० बस घेण्याचा पालिकेचा मानस असून, पहिल्या टप्प्यात १० बस घेतल्या जातील. युरोपच्या धर्तीवर ज्या पद्धतीने इलेक्ट्रिक बस धावत आहेत, त्याच पद्धतीचा अवलंब करून ठाण्यातही ही सेवा देण्याचा एका कंपनीचा मानस असल्याचे पालिका सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)
>बस थांब्यांवर चार्जिंग पाँइंटस् उपलब्ध होणार
या बस खासगी माध्यमातून घेतल्या जाणार असून, त्यावरील चालक, वाहक, चार्जिंग आॅपरेटर हे संबंधित एजन्सीचे असतील. पालिका केवळ त्यांच्यासाठी जागा देणार असून, बसच्या थांब्यांवर चार्जिंग सेंटर उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
आरटीआय नियमानुसार तिकिटाचे दर आकारण्यात येणार आहेत, परंतु यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून संबंधित ठेकेदार पालिकेला एका बसपोटी महिनाकाठी १० हजार रुपये देणार आहे. त्यानुसार, १०० बसपोटी १० लाखांचे उत्पन्न काही न करता पालिकेला मिळणार आहे.
या बस घेण्याच्या प्रक्रियेला वेग येत असून, निविदा अंतिम करण्यासाठी येत्या स्थायी समितीच्या बैठकीत या संदर्भातील प्रस्ताव मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे.
पहिल्या टप्प्यात ज्या १० बस येणार आहेत, त्यात मागील बाजूला संबंधित एजन्सी वाय-फाय स्टेशन अथवा लॅपटॉप आणि प्रिंटर अथवा इतर कोणत्याही सुविधा उपलब्ध करून देऊ शकते. त्याचे चार्जेस हे त्यांचे उत्पन्न असेल.