24 ऑगस्टला कल्याण तालुक्यात सहा ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार
By Admin | Updated: July 31, 2016 14:38 IST2016-07-31T14:38:00+5:302016-07-31T14:38:00+5:30
राज्य निवडणूक आयोगाने मुंबई ग्रामपंचायत (निवडणूक) नियम 1959 मधील नियम 7 मधील पोट नियम 1 अन्वये कल्याण तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम 24 ऑगस्ट रोजी

24 ऑगस्टला कल्याण तालुक्यात सहा ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार
उमेश जाधव
टिटवाळा - राज्य निवडणूक आयोगाने मुंबई ग्रामपंचायत (निवडणूक) नियम 1959 मधील नियम 7 मधील पोट नियम 1 अन्वये कल्याण तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम 24 ऑगस्ट रोजी जाहिर करण्यात आला आहे. फळेगांव, रुंदे, उशिद, मामनोली, दहिवली आवडली, केळणी कोलिंब या ग्रामपंचायतींचा त्यात समावेश आहे. या कामी कल्याण तहसिलदार कार्यालयीन यंत्रणा कामाला लागली आहे. तसेच गाव पातळीवर निवडणूकीसाठी मोर्चे बांधणी तर काही ठिकाणी निवडणूक बिनविरोध कशी होईल यासाठी बैठका सुरू झाल्या आहेत.
तालुक्यातील फळेगाव, उशिद या पंचायतींच्या निवडणुका गेली 15 वर्षे ग्रामस्थांच्या सहकार्याने बिनविरोध पार पाडल्या आहेत. त्याच धर्तीवर या वेळीही पंचायत निवडणुका बिनविरोध करण्यासाठी ग्रामस्थांनी बैठका घेणे सुरू केले आहे. यात फळेगांव ग्रामस्थांनी बैठक घेतली असून ही ग्रामपंचायत बिनविरोध होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अशा प्रकारच्या बैठका इतर ग्रामपंचायतींच्या ग्रामस्थांनी घेऊन सर्वच ग्रामपंचायतींच्या निवडणूका शांततेत पार पाडाव्यात अशा प्रकारचे मत तहसिलदार किरण सुरवसे यांनी "लोकमतशी" बोलताना व्यक्त केली.
त्या परिने आम्ही राजकिय पक्ष कार्यकर्ते यांना देखील आवाहन आहे. तसेच ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध होण्यासाठी स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी ग्रामस्थांना आवाहन करणारे पत्र या सहा ग्रामपंचायतींच्या गावातील घरोघरी वाटप केले आहे. पंचायत निवडणुका बिनविरोध करून गावातील सामाजिक सलोखा आणि ऐक्य कायम ठेवा, ग्रामपंचायत निवडणुका याच गावातील संघर्ष आणि तणावाचे कारण आहे. गावांच्या सर्वांगीण विकासाला त्यामुळे खीळ बसते, असे या पत्रकात म्हटले आहे.
बुधवार दिनांक 3 ते 9 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र मागविणे व सादर करणे.
7 ऑगस्ट सार्वजनिक सुट्टीचा रवीवार वगळण्यात आला आहे. 10 ऑगस्ट रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी, तर 12 ऑगस्ट रोजी दुपारी नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. तसेच याच दिवशी चिन्हे वाटप करण्यात येणार असून निवडणूक लढविणार्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. बुधवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत मतदान होणार असून मतमोजणी 29 ऑगस्ट रोजी होणार आहे.
यावेळी देखील मतदार यादीतील घोळ या वेळीही कायम आहे. त्यामुळे प्रभाग वगळून अन्यत्र नावे गेल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. सध्या काही ठिकाणी ग्रामपंचायतीच्या या निवडणुकांकडे जिल्हा परिषद आणि तालुका पंचायत समिती निवडणुकांची रंगीत तालीम म्हणून देखील पाहिले जात आहे.