Rajan Salvi Latest News: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात खिंडार पडले आहे. माजी आमदार राजन साळवी यांनी ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभा निवडणुकीपासून राजन साळवी पक्षांतर्गत संघर्षामुळे नाराज होते. शिंदेंसोबत जाण्यासाठी निमित्त नव्हतं, ते आता मिळालं म्हणत त्यांनी याबद्दल अप्रत्यक्षपणे भाष्य केले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मुंबईमध्ये राजन साळवी यांची उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीला उद्योगमंत्री उदय सामंत, किरण सामंतही उपस्थित होते. बुधवारी झालेल्या या बैठकीनंतर राजन साळवी यांनी पहिल्यांदाच भूमिका मांडली.
"शिंदेंसोबत मागच्या काळात जाता आलं नाही, कारण..."
राजन साळवी म्हणाले, "उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे माझे पहिल्यापासून गुरू होते. मागच्या काळात त्यांच्यासोबत मी जाऊ शकलो नाही. पण, जाण्यासाठी निमित्त लागतं. ते निमित्त लागलं आणि आज मी याठिकाणी आलो. शिंदे साहेबांचा आशीर्वाद घेतला. आजच्या बैठकीला जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत होते", असे राजन साळवी शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी सांगितले.
"आमच्या मतदारसंघासंदर्भात आणि जिल्ह्यासंदर्भात आवश्यक चर्चा झाली. चर्चा सकारात्मक झाली आहे. सामंत बंधुही समाधानी आहेत. आम्हा सर्वांना शिंदे साहेबांचा आशीर्वाद आवश्यक आहे. भविष्यात आम्ही एकत्रपणे जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात काम करू, असे वचन आम्ही त्यांना (एकनाथ शिंदे) दिले आहे", अशी माहिती राजन साळवींनी दिली.
'एकनाथ शिंदेंनी जबाबदारी घेतली आहे'
"उद्या सर्वांच्या उपस्थितीत माझा पक्षप्रवेश होईल. त्याबद्दल मी समाधानी आहे. राजन साळवीला कुठे मानसन्मान द्यायचा, कसा द्यायचा याची सर्व जबाबदारी एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. अजिबात काळजी करू नका. जे काही बोलायचं आहे, ते मी उद्या बोलेन", असे राजन साळवी म्हणाले.