काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी परराष्ट्र मंत्र्यांना प्रश्न विचारल्यावरून राजकारण तापले आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनी काँग्रेस आणि राहुल गांधींवर निशाणा साधला. 'राहुल गांधींना देशभक्तींपेक्षा राजकारणात अधिक रस आहे', श्रीकांत शिंदे म्हणाले आहेत.
राहुल गांधींनी त्यांच्या अधिकृत एक्स हँडलच्या माध्यमातून परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना प्रश्न विचारले. आम्हाला सांगा की, "आपण किती विमाने गमावली आहेत. ही चूक नव्हती तर गुन्हा होता. देशाला सत्य जाणून घेण्याचा अधिकार आहे", असे राहुल गांधी म्हणाले. तेव्हापासून राहुल गांधी सत्ताधारी पक्षाच्या निशाण्यावर आहेत.