वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत पारित झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. "वक्फ सुधारणा विधेयक जर मुस्लिमांच्या हिताचे आहे तर हिंदुत्व आम्ही सोडले की तुम्ही सोडले? उद्या हिंदू देवस्थानावर गैर हिंदू लादला तर ते आम्ही सहन करू का? तर नाही. आम्ही हिंदुत्व सोडले असे काही बाटगे म्हणतात मग तुमच्या आजूबाजूला मुस्लिमांचे कौतुक होत होते तेव्हा तुम्ही का गप्प बसला?" असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी शिंदेसेना आणि भाजपावर हल्लाबोल केला. याला आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
"मला 'एसंशिं' म्हणता तुम्ही 'यूटी' म्हणजे यूज अँड थ्रो का?, राहुल गांधींच्या सोबत राहिल्याने उबाठाला वारंवार जिनांची आठवण येते, हे दुर्दैव आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. काय करायचं हे समजत नाही" असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. "कालचा दिवस हा खऱ्या अर्थाने उबाठासाठी दुर्दैवी दिवस होता. ते म्हणतात आमचा वक्फ बिलाला विरोध नाही तर भाजपाच्या ढोंगीपणाला विरोध आहे. अतिशय गोंधळलेल्या परिस्थिती काय बोलायचं, काय निर्णय घ्यायचा, काय करायचं हे सूचत नसलेलं आज दिसलं आहे. धरलं की चावतंय आणि सोडलं की पडतंय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे."
"पायाखालची वाळू सरकली"
"देशभक्त मुस्लिमांना बाळासाहेबांचा पाठिंबा होता. तिच भूमिका आमची आहे, भाजपाची आहे. देशविरोधी कृत्य करणाऱ्यांना मग ते कोणीही असो त्यांना आमचा विरोध आहे. बाळासाहेब जी भूमिका घेऊन चालले तिच भूमिका या वक्फ बोर्डाच्या वेळी भाजपानेही दाखवली. सातत्याने राहुल गांधी यांची सावली असल्यामुळे, त्यांच्यासोबत राहिल्याने उबाठाला वारंवार जिनांची आठवण येते. हे दुर्दैव आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. काय करायचं हे समजत नाही. हे स्वत:ची अब्रू काढून घेण्यासारखं आहे" असं म्हणत शिंदेंनी ठाकरेंवर टीका केली आहे.
"यूटी म्हणजे यूज अँड थ्रो का?"
"वक्फ बोर्डाचं बिल आणल्याने काही मुठभर लोकांच्या हातात लाखो, करोडो एकर जी जमीन होती त्याला चाप बसणार आहे. मोदीजींच्या वक्फ बोर्डाच्या निर्णयामुळे मुठभर लोकांना चाप बसेल, निर्बंध बसेल. मुस्लिम लोकांनी याचं स्वागत केलेलं आहे. गोंधळलेल्या अवस्थेत एखादं नेतृत्त्व गेलं की त्या पक्षाचा इतिहास संपुष्टात येत असतो. त्यांची जी परिस्थिती झाली आहे ती महाराष्ट्र पाहतोय. आम्ही बाळासाहेबांचे, आनंद दिघेंचे विचार पुढे घेऊन जात आहोत. वैचारिक तडजोड करणार नाही. मला एसंशिं म्हणता तुम्ही यूटी म्हणजे यूज अँड थ्रो का? मला बोलायला लावू नका. मी शांत आहे. मला गद्दार, खोके म्हणालात. तुम्हाला महाराष्ट्रातील जनतेने खोक्यात बंद करून टाकलं. आम्ही ८० लढवल्या आणि ६० आलो... त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने गद्दार कोण याचा फैसला केला आहे" असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.