मुंबई - गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे- देवेंद्र फडणवीस यांच्यातील कटुता संपल्याची चिन्हे दिसून येत आहे. उद्धवसेनेच्या मुखपत्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक, गाठीभेटी पाहता ठाकरे फडणवीस जवळ येतील अशी चर्चा आहे. त्यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने नवी चाल खेळत थेट उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. शिंदेसेनेची संघटनात्मक बैठक वांद्रे येथे पार पडली. या बैठकीत पक्ष संघटना मजबुतीसोबत एक ठरावही संमत करण्यात आला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
काय आहे ठराव?
शिवसेनेच्या विचारधारेला काळीमा फासण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केले. लाचारी करुन काँग्रेससोबत गेलेल्या उद्धव ठाकरे यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदी राहण्याचा नैतिक अधिकार नाही असा घणाघात शिवसेना नेते रामदास कदम यांनी केला. स्मारकाचा खर्च शासनाचा असून उद्धव ठाकरे आयत्या बिळावर नागोबाप्रमाणे अध्यक्षस्थानी बसले आहेत. त्यामुळे त्यांची स्मारकाच्या अध्यक्षपदावरुन ताबडतोब हकालपट्टी व्हावी, ही आमची मागणी आहे. याबाबत आजच्या बैठकीत ठराव घेण्यात आला असून तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवला जाईल असं कदम यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्रिपद न मिळाल्याने एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यानंतर घडलेल्या घडामोडीत शिंदेंनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्याची तयारी दाखवली. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून उद्धव ठाकरेंकडून पुन्हा फडणवीसांसोबत जवळीक साधण्याचे प्रयत्न सुरू केलेत. नागपूर हिवाळी अधिवेशनात कटुता विसरून ठाकरे फडणवीस हे दोन्ही नेते विधानभवनात भेटले. या भेटीनंतर सामनाच्या अग्रलेखातून फडणवीस यांचं कौतुक केल्याचं दिसून आले. त्याशिवाय आदित्य ठाकरे यांनीही देवेंद्र फडणवीस यांची ३ वेळा भेट घेतली. या गाठीभेटी अन् होणाऱ्या चर्चा एकनाथ शिंदेंच्या सेनेसाठी चिंतेचा विषय आहेत.
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर घणाघात केला होता. एकतर तू राहशील किंवा मी राहीन असं सांगत ठाकरेंनी फडणवीसांवर प्रत्येक सभेतून हल्लाबोल केला तरीही निकालानंतर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यात एका मुलाखतीत राज ठाकरे की उद्धव ठाकरे असा प्रश्न देवेंद्र फडणवीसांना केला तेव्हा राज ठाकरे मित्र आहेत पण उद्धव ठाकरे शत्रू नाहीत असं सूचक विधान केले. त्या विधानावर शिवसेना मंत्री गुलाबराव पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. हे लोक कुणाचेच नाहीत असं सांगत फडणवीसांनी विचार करायला हवा असा सल्ला गुलाबराव पाटलांनी दिला होता. त्यात आता शिंदेंच्या शिवसेनेकडून बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीतून उद्धव ठाकरेंची हकालपट्टी करावी अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेनेची ही नवी चाल त्यात उद्धव ठाकरे अडकणार की देवेंद्र फडणवीस अशी दबक्या आवाजात चर्चा आहे.