शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या निवासस्थानी जाऊन सहकुटुंब भेट घेतली. मात्र या भेटीदरम्यान उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना मागे बसवण्यात आल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत आहे. यावर आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली.
उद्धव ठाकरेंना मागच्या रांगेत बसण्यावरून सुरू असलेल्या चर्चांबाबत शिंदेंना विचारण्यात आलं. त्यावर "काँग्रेसने उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवली आहे. त्यांना या गोष्टीचं काहीच वाटत नसेल तर मी यावर काय प्रतिक्रिया देणार. हे उलट तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे की तुम्हाला इतक्या मागे का बसवलं होतं?" असं म्हणत उपमुख्यमंत्र्यांनी खोचक टोला लगावला आहे.
"आम्ही बाळासाहेबांचा आणि हिंदुत्वाचा विचार घेऊन पुढे चाललो आहे. विकासाचा विचार पुढे घेऊन चाललो आहे. त्यामुळे श्रीकांत शिंदेंना काही देशांचा दौरा करणाऱ्या डिलीगेशनचा हेड बनवला आहे. त्यामुळे मोदींना कोणाचा सन्मान करायचा, कोणाला मान द्यायचा हे त्यांना माहिती आहे. यात बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन चाललोय हा त्या विचाराचा सन्मान आहे."
"ज्यांचा अवमान झाला, त्यांना त्याचं काहीच वाटत नसेल तर मी यावर काय प्रतिक्रिया देणार... तुम्ही त्यांना याबाबत विचारायला हवं. ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, ज्यांनी विचार सोडले... त्यांचं हे असंच होणार आहे. त्यांची जागा त्यांना काँग्रेसने दाखवली. त्यामुळे अनेक लोक म्हणतात की, विचार पुढे असतात आणि लाचार मागे असतात" असं देखील एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.