NCP Ajit Pawar: रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेत सुरू असलेल्या वादाचा नवा अंक आज पाहायला मिळाला. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी रायगडच्या जिल्हा नियोजन समितीची वार्षिक बैठक आयोजित केली होती. मात्र या बैठकीला आम्हाला निमंत्रितच करण्यात आलं नसल्याचं सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या रायगड जिल्ह्यातील आमदारांनी टीकेची झोड उठवली. या पार्श्वभूमीवर आता अजित पवारांच्या कार्यालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.
"नाशिक आणि रायगड या दोन्ही जिल्ह्यांना सद्यस्थितीत पालकमंत्री नाहीत. त्यामुळे सदर जिल्ह्यांतील केवळ मंत्र्यांनाच जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. रायगडमधून मंत्री आदिती तटकरे आणि मंत्री भरत गोगावले यांना निमंत्रण देण्यात आलं होतं. परंतु भरत गोगावले बैठकीसाठी हजर राहिले नाहीत," असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयाकडून करण्यात आला आहे.
दरम्यान, नाशिकच्या जिल्हा नियोजन समितीचीही आज बैठक होणार असून या बैठकीसाठी त्या जिल्ह्यातील मंत्री दादा भुसे, माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवाळ यांच्यासह गिरीश महाजन यांना निमंत्रण देण्यात आलं आहे, अशी माहितीही अजित पवारांच्या कार्यालयाने दिली आहे.
शिंदेसेनेचे आमदार काय म्हणाले?
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला न बोलावल्याने शिंदेसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे. "या बैठकीचं आम्हाला निमंत्रण नव्हतं. खरं म्हणजे अजित पवारांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. आदिती तटकरे त्या बैठकीला उपस्थित होत्या. पण, आमच्या तिन्ही आमदारांनाही दुरान्वयानेही कल्पना नाही. निरोप पण आलेला नाही. यासंदर्भात मी डीपीओकडून माहिती घेतली. ते बैठकीला उपस्थित होते. जिल्हाधिकारी व्हर्च्युअली उपस्थिती होते. जिल्ह्यातील आमच्या कोणत्याही आमदाराला कोणतीही सूचना नव्हती. खरंतर ही बैठक अधिकृत की अनधिकृत आम्हाला माहिती नाही. पण, यासंदर्भात आमचे नेते एकनाथ शिंदेंसोबत आम्ही निश्चितपणे चर्चा करणार आहोत. आमच्यावर वारंवार होणाऱ्या अन्यायाबद्दल न्याय मिळाला पाहिजे. रायगडमध्ये पालकमंत्र्यांचा तिढा अजूनही सुटलेला नाही. आमची आग्रही मागणी आहे की, भरत गोगावले पालकमंत्री व्हायला हवेत", अशी मागणी आमदार दळवी यांनी केली.