कर्जमुक्ती आणि शिवभोजन योजना आणली त्याचा आनंद- एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2020 04:12 AM2020-03-06T04:12:15+5:302020-03-06T04:12:56+5:30

राज्यात बारीकशीही घटना घडली नाही, हे आमच्या सरकारचे यश आहे असे मत शिवसेना नेते व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

Eknath Shinde brought debt relief and Shiv Bhojana Yojana | कर्जमुक्ती आणि शिवभोजन योजना आणली त्याचा आनंद- एकनाथ शिंदे

कर्जमुक्ती आणि शिवभोजन योजना आणली त्याचा आनंद- एकनाथ शिंदे

googlenewsNext


मुंबई : शेतकऱ्यांची कर्जमुक्ती आणि १० रुपयात शिवभोजन ही योजना आखून त्याची अंमलबजावणी १०० दिवसात पूर्ण झाली याचा सगळ्यात मोठा आनंद माझ्यासारख्या सच्च्या शिवसैनिकास आहे. सीएए , एनआरसी वरुन दिल्लीत काय घडले ते देशाने पाहिले पण महाराष्टÑात बारीकशीही घटना घडली नाही, हे आमच्या सरकारचे यश आहे असे मत शिवसेना नेते व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. त्यांच्याशी झालेली ही बातचित.
आज तिघांमधील समन्वय कसा आहे, कुठे सुधारणा करण्याची गरज आहे?
उत्तम समन्वय आहे. तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते सातत्याने एकमेकांच्या संपर्कात आहेत. उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री म्हणून घट्ट पकड आहे. शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ अनुभवी नेत्यांचे मार्गदर्शन सतत आहे. सरकार स्थापनेनंतर राज्यात ज्या निवडणुका झाल्या त्या आम्ही आघाडी म्हणून लढवल्या आणि उत्तम यश प्राप्त केले. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही.
या सरकारला १०० दिवस पूर्ण झाले. या काळात तुम्हाला जे अपेक्षित होते ते पूर्ण होत आहे का?
स्थिर प्रगतिशील सरकार देऊन निर्भय वातावरण निर्माण करणे, विकासाला गती देणे, याला आमचे सर्वोच्च प्राधान्य होते व राहील. शेतकरी कर्जमुक्ती, १० रुपयांत पोटभर जेवण देणारी शिवभोजन योजना आमच्या वचननाम्यातील आणि सरकारच्या किमान समान कार्यक्रमातील महत्त्वाच्या योजना आम्ही अवघ्या १०० दिवसांत कार्यान्वित केल्या. त्याचे लाभ आता थेट शेतकऱ्यांना व गोरगरिब जनतेला मिळू लागले आहेत ही समाधानाची गोष्ट आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे मंत्रीवेगवेगळी विधाने करतात, त्यावर शिवसेना नेते म्हणून तुमची प्रतिक्रिया काय असते, त्याकडे कसे पहाता?
प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य लोकशाहीत आहे. सरकारमधील आम्ही सर्व पक्ष लोकशाहीवर विश्वास ठेवणारे आहोत. एखाद्या नेत्याने विधान केले, म्हणजे लगेच तेच सरकारचे धोरण आहे, असे मानणे गैर व अपरिपक्वपणाचे आहे. आघाडीची समन्वय समिती आहे. तिथे प्रत्येक विषयावर चर्चा होते. एकमतानेच निर्णय होतात. कुठलाही विसंवाद नाही. जो काही दिसतो तो विरोधकांनी केलेला अपप्रचार आहे.
राष्ट्रवादी व काँग्रेस सोबत जाण्याआधी व नंतर या २ फेजमधला अनुभव कसा आहे, एक दोन उदाहरणांसह सांगाल का?
शिवसेना, काँग्रेस, राष्टÑवादी या तिन्ही पक्षाच्या विचारधारा वेगळ्या आहेत. ही अनैसर्गिक आघाडी आहे, हे सरकार टिकणार नाही, अशी टीका केली जात होती. मात्र, राजकीय विचारधारा भिन्न असल्या तरी जनतेचे हित आणि राज्याचा विकास, ही उद्दिष्टे समायिकच आहेत. तिन्ही पक्षांच्या प्रमुखांमध्ये विश्वास व समन्वय आहे. विसंवाद नाही. कुठेतरी एखादे विधान मोठे करून विसंवाद असल्याचे चित्र निर्माण केले जाणे योग्य नाही. प्रत्येक मुद्यावर मुख्यमंत्री यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. तीच सरकारची अंतिम भूमिका असेल.
नगरविकास विभागाचे मंत्री म्हणून १०० दिवसात काय वेगळे करू शकलात?
मल:निस्सारण व्यवस्थेसाठी याच १०० दिवसात ३ हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत. पुढल्या टप्प्यात आणखी १७ हजार कोटी रुपये उपलब्ध करून दिले जाणार आहेत. पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांना गती देणे, अंमलबजावणीतले अडथळे दूर करण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न गंभीर आहे. त्यावर प्राधान्याने काम करणे गरजेचे आहे.

Web Title: Eknath Shinde brought debt relief and Shiv Bhojana Yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.