एकनाथ खडसेंना दाऊदच्या घरुन फोन, राज्य सरकारचे चौकशीचे आदेश
By Admin | Updated: May 21, 2016 17:20 IST2016-05-21T15:18:49+5:302016-05-21T17:20:22+5:30
महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या घरुन फोन आल्याचं वृत्त आहे, राज्य सरकारने याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत

एकनाथ खडसेंना दाऊदच्या घरुन फोन, राज्य सरकारचे चौकशीचे आदेश
>ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 21 - अंडरवर्ल्ड आणि राजकारण यांचं नात तसं जुनं नाही. यातूनच पाकिस्तानमधून आलेल्या एका फोनमुळे सध्या राजकीय वातावरण तापलं आहे. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या घरुन फोन आल्याचं वृत्त आहे. राज्य सरकारने याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. हा फोन दाऊदच्या कराचीमधील घरातून एकनाथ खडसे यांच्या मोबाईलवर करण्यात आला होता अशी माहिती मिळत आहे. मात्र एकनाथ खडसे यांनी दाऊदशी आपण कधीच संवाद साधला नसल्याचा दावा केला आहे.
आज तक वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार याप्रकरणी महत्वाची कागदपत्र त्यांच्या हाती लागली आहेत. इंडिया टुडेने काही दिवसांपुर्वी दिलेल्या बातमीत दाऊद इब्राहिमच्या इंटरनॅशनल कॉल लिस्टमध्ये सर्वात जास्त वेळा डायल केलेल्या क्रमांकामध्ये महाराष्ट्रामधील एका वरिष्ठ नेत्याचा समावेश असल्याची माहिती दिली होती.
वडोदरामधील एका हॅकरने दाऊद इब्राहिमची पत्नी महजबीन शेखच्या नावे असलेल्या चार फोन क्रमांकाची कॉल डिटेल्स काढून इंडिया टुडेच्या हवाली केली होती. या कागदपत्रांवरुन मिळालेल्या माहितीच्या आधारे एक क्रमांक महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या नावावर रजिस्टर आहे.
विरोधी पक्षाने याप्रकरणी खडसेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. खडसेंवर कडक कारवाई करण्यात यावी तसंच राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी लावून धरली आहे. सरकारने मात्र याप्रकरणी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
फोन क्रमांक आपल्याच नावे रजिस्टर असल्याची कबुली खडसेंनी दिली आहे. मात्र आपण दाऊदशी कधीही बोललो नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. दाऊद किंवा त्याच्या कोणत्याही नातेवाईकाशी आपण कधी बोललेलो नाही. दाऊद इब्राहिमच्या फोनवरुन आपल्याला फोन का लावला माहिती नाही. तपासात ही गोष्ट समोर येईल असं खडसे बोलले आहेत.
यादरम्यान दाऊद तसंच त्याच्या नातेवाईकांच्या नावे रजिस्टर असलेल्या चार फोन क्रमांकावरुन भारतात येणा-या फोनवर लक्ष ठेवून होतो अशी कबुली गुप्तचर यंत्रणेच्या अधिका-यांनी दिली आहे.
एकनाथ खडसेंचं स्पष्टीकरण -
प्रीती मेनन यांचे आरोप बिनबुडाचे आहेत. सदर फोन मी वर्षभरापासून वापरत नाही तसंच फोन सुरु होता त्यावेळी एकही आंतरराष्ट्रीय फोन केलेला नाही. सेवा पुरवणा-या कंपनीने पत्राद्वारे ही माहिती दिली आहे. सदर नंबर क्लोन करुन वापरला असल्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा तपास यंत्रणेकडून करण्यात यावा अशी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करतो.