लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : समविचारी पक्षांशी युती झाली तर ठीक, अन्यथा महापालिका निवडणूक स्वबळावर लढविणार आहोत. विधानसभा निवडणुकीत जे झाले ते विसरून आगामी निवडणुकांच्या तयारीला लागा, असे आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वरिष्ठ नेते आणि विभाग अध्यक्षांना मंगळवारच्या बैठकीत दिल्याचे समजते. पक्षात लवकरच फेरबदलाचे संकेतही ठाकरे यांनी दिल्याचे एका पक्ष पदाधिकाऱ्याने सांगितले.
गेल्या निवडणुकीत आपले काय चुकले, कुठे कमी पडलो याचा आढावा त्यांनी बैठकीत घेतला. पालिका निवडणूक लढविण्याबाबत तुमचे काय मत आहे?, अशी विचारणा त्यांनी पदाधिकाऱ्यांना केली. तसेच, शिवसेना पक्ष वाढविण्यासाठी प्रमोद नवलकर, दत्ताजी साळवी, वामनराव महाडिक, मनोहर जोशी, दिवाकर रावते यांसारख्या नेत्यांनी जे प्रयत्न केले, तसे प्रयत्न आपल्या पक्षातील नेत्यांकडून होताना दिसत नाही, असे परखड बोलही नेत्यांना सुनावल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मेळाव्यातून कोणते मुद्दे पुढे येतात?
- मराठी आणि हिंदुत्वाचे मुद्दे विभाग पातळीवर नेले पाहिजेत, त्यावर विचार करण्याची गरज आहे, असे मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी सांगितले.
- त्यावर राज ठाकरे यांनी मी भाषणांमधून किंवा माध्यमांमधून त्यावर नेहमी बोलत असतो. पण, त्यात सातत्य ठेवून हे मुद्दे पुढे नेण्याचे काम कुणाचे आहे? मेळाव्यामधून कोणते नेते हे मुद्दे पुढे नेतात, असा सवालही राज यांनी केल्याचे सूत्रांनी सांगितले.
युतीत खोडा कुणाचा?
- लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीत जाण्यासंदर्भात चर्चा झाली होती. भाजपकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता.
- विधानसभा निवडणुकीत बाळा नांदगावकर आणि अमित ठाकरे यांना सर्वांत आधी भाजपने जाहीर पाठिंबा दिला होता.
- परंतु, एकनाथ शिंदे यांच्या आडमुठ्या धोरणामुळे युती झाली नाही. त्यामुळे पुढे काय निर्णय घ्यायचा यावर बैठकीमध्ये चर्चा करण्यात आल्याचे या सूत्रांनी सांगितले.