लातूरमध्ये ऑइल मीलची टाकी साफ करताना आठ कामगार बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2017 21:56 IST2017-01-30T21:56:40+5:302017-01-30T21:56:40+5:30
कीर्ती आॅईलमिलमध्ये संध्याकाळच्या वेळी केमिकल टँकची स्वच्छता करण्यासाठी उतरलेले ७ ते ८ कामगार चार-पाच तासांपासून बाहेर न आल्यामुळे खळबळ

लातूरमध्ये ऑइल मीलची टाकी साफ करताना आठ कामगार बेपत्ता
ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. 30 - येथील १२ नंबर पाटीजवळ असलेल्या कीर्ती आॅईलमिलमध्ये संध्याकाळच्या वेळी केमिकल टँकची स्वच्छता करण्यासाठी उतरलेले ७ ते ८ कामगार चार-पाच तासांपासून बाहेर न आल्यामुळे खळबळ उडाली आहे. हे सर्व कामगार मयत झाले असल्याच्या संशयाने लातूरच्या औद्योगिक वर्तुळात धक्का बसला आहे. रात्री उशिरापर्यंत केमिकल टँकमध्ये अडकलेल्या कामगारांना कसे काढायचे, याचे शर्थीने प्रयत्न चालू होते. त्यामुळे नेमके किती कामगार अडकले व किती जणांचा मृत्यू झाला, याची अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.
लातुरातील प्रसिद्ध कीर्ती आॅईल मिलचे १२ नंबर पाटी येथे युनिट आहे. या मिलमधील एका केमिकल टँकची दर दहा-पंधरा दिवसाला स्वच्छता होते. सोमवारी संध्याकाळच्या सुमारास या टँकच्या स्वच्छतेसाठी काही कामगार हे टाकीत उतरले. मात्र ते परत आले नाहीत. त्यामुळे अन्य कामगार टाकीत उतरलेले कामगार का परत आले नाहीत, या चौकशीला गेले. मात्र तेही परत आले नाहीत. असे सात ते आठ कामगार या टाकीत उतरल्याची शंका व्यक्त केली जात आहे. यातील एकही कामगार बाहेर न आल्यामुळे या सर्वांचा मृत्यू झाला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याबाबत अधिकृत माहिती कोणतीच बाहेर आली नाही. मिलचे संचालक कीर्ती भुतडा यांच्याशी संपर्कही होऊ शकला नाही. त्यामुळे नेमक्या कामगारांचा मृत्यू झाला, हेही कळू शकले नाही. परंतु, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ७ ते ८ जण या टाकीत बेपत्ता झाल्याचे बोलले जाते.
केमिकल टँकमध्ये नेमके काय झाले..?
आॅईल मिलमधील या केमिकल टँकमध्ये मोठ्या प्रमाणात अशुद्ध रासायनिक द्रव्य व पाणी जमा होते. हा टँक स्वच्छ करण्यासाठी मोठ्या प्रमाणात स्वच्छतेसाठी आवश्यक असलेले केमिकल टाकून ठेवले जाते. ठराविक दिवसात हे केमिकल टाकीतील इतर रासायनिक द्रव्याला स्वच्छ करून संपूर्ण टँक धुवून काढला जातो. यासाठी काही कंत्राटी कामगार नियुक्त केलेले आहेत. हे कामगार नियमितपणे सोमवारी स्वच्छतेसाठी उतरले होते. परंतु, ते बाहेरच आले नाहीत. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण केमिकलमध्ये दडले आहे की केमिकलपासून तयार झालेल्या विषारी वायूमुळे? याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत.