व्यापाऱ्याच्या अपहरणप्रकरणी आठ जणांना जन्मठेप
By Admin | Updated: August 24, 2016 03:57 IST2016-08-24T03:57:50+5:302016-08-24T03:57:50+5:30
पिंपळगावच्या कांदा व्यापाऱ्याचे खंडणीसाठी अपहरण केल्याप्रकरणी निफाड सत्र न्यायालयाने आठ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

व्यापाऱ्याच्या अपहरणप्रकरणी आठ जणांना जन्मठेप
नाशिक : पिंपळगावच्या कांदा व्यापाऱ्याचे खंडणीसाठी अपहरण केल्याप्रकरणी निफाड सत्र न्यायालयाने आठ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. न्यायालयाने तपासास अनेक त्रुटी राहिल्याचे निरीक्षण नोंदवित महासंचालकांना पुन्हा चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
पिंपळगावचे व्यापारी शंकर मूलजी ठक्कर यांचे १९ डिसेंबर २०१२ मध्ये खंडणीसाठी कांद्याच्या चाळीमधून अपहरण झाले होते. अपहरणकर्त्यांनी ठक्कर यांचा भाऊ करसन यांच्याकडे १५ कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. ग्रामीण पोलिसांनी सापळा रचून खरशिंदे (अहमदनगर) गावात पाच कोटींच्या रोकडसह एकू ण ११ आरोपींना अटक केली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मोबाइल टॉवर लोकेशन घेऊन आरोपींचा माग काढला होता.
खटल्याची सुनावणी निफाड सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. जे. मंत्री यांच्यासमोर झाली. खटल्यासाठी सरकारने विशेष सरकारी वकील अॅड. अजय मिसर यांची नियुक्ती केली होती. त्यांनी सरकारी पक्षातर्फे २१ साक्षीदार तपासले. त्यात आरोपींविरूद्ध सबळ पुरावा उपलब्ध झाल्याने न्यायालयाने आठही आरोपींना जन्मठेप व दंडाची शिक्षा सुनावली. (प्रतिनिधी)
>पाच कोटी देऊन तडजोड
करसन यांनी भावाची सुटका करण्यासाठी आरोपींना खरशिंदे शिवारात पाच कोटी दिले होते. त्यानंतर आरोपींनी ठक्कर यांना त्यांच्याकडे सोपविले. मात्र शंकर यांच्या शरीरावर मारहाणीच्या जखमा होत्या, हाच मोठा पुरावा ठरला.
>सामान्य नागरिकांत दहशत
खंडणी वसुलीसाठी व्यापाऱ्यांच्या मुलांचे अपहरण करणे, तसेच धारदार शस्त्राचा धाक दाखवून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे यासारखे गुन्हे वाढत आहे. न्यायालयाच्या निकालामुळे अशा प्रकारच्या गुन्हेगारीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होईल. पोलिसांनी गुन्ह्यांचा गांभीर्याने सखोल तपास करण्यावर भर देण्याची गरज आहे.
- अॅड. अजय मिसर, विशेष सरकारी वकील
>निर्दोष सुटका : संशयित सुनील भाऊराव पिठे (१९), कोंडाजी चंद्रभान वाडेकर (२१), बाळासाहेब भागवत वाडेकर (२४) यांच्याविरुद्ध न्यायालयाला सबळ पुरावे आढळून न आल्याने सत्र न्यायालयाने त्यांची निर्दोेष सुटका केली आहे.
>यांना झाली शिक्षा
सचिन दामोदर पाटील (२५), तुषार विक्रम बैरागी (२०) (दोघे रा. पिंपळगाव), मुलानी दाऊन हुसेन (२१, रा. पाचोरे वणी), सागर विजय गवळी (२१, रा. बेहेड), अर्जुन मधुकर रहाणे (२५, रा. सुकेणे), योगेश दौलत गडाख (२१, रा. पाचोरे वणी), संतोष मनोहर हतांगळे (२५, रा. शांतीनगर) विश्वजित ऊर्फ सोनू किरण थेटे (२४, रा. शिवाजीनगर) यांना विविध गुन्ह्यांमध्ये जन्मठेप व सक्तमजुरी आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे.