कंटेनरखाली चिरडून आठ ठार

By Admin | Updated: November 16, 2014 23:35 IST2014-11-16T22:20:00+5:302014-11-16T23:35:25+5:30

पारगावातील दुर्घटना : एसटीची वाट पाहणाऱ्यांवर काळाचा घाला; मृत खंडाळा तालुक्यातील

Eight dead, crushed under the container | कंटेनरखाली चिरडून आठ ठार

कंटेनरखाली चिरडून आठ ठार

शिरवळ : पुणे-बंगलोर महामार्गावर पारगाव येथे एसटी बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांच्या अंगावर भर वेगात असणारा कंटेनर उलटल्यामुळे आठजण चिरडून जागीच ठार झाले. आज, रविवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ठार झालले सात प्रवासी खंडाळा तालुक्यातील आहेत. दरम्यान, या घटनेनंतर कंटेनरचालक नवनाथ आजिनाथ गीत (रा. खंदा कॉलनी, पनवेल, नवी मुंबई) हा पळून गेला होता. त्याला पोलिसांनी अटक केली.
नेहा बापू वाघमारे, प्रमोद बापू वाघमारे (रा. सुखेड, ता. खंडाळा), शरीफा ऊर्फ हवाबी फकीरमहमंद मांजोरी-कच्छी (रा. लोणंद, ता. खंडाळा, मूळ रा. चिरागनगर, घाटकोपर, मुंबई), अविनाश ज्ञानेश्वर गेडाम (वय २0 रा. रत्नापूर, ता. शिंदेवाडी, जि. चंद्रपूर), शबाना फकीरमहंमद मांजोरी-कच्छी (रा. लोणंद, ता. खंडाळा, मूळ रा. घाटकोपर, मुंबई), सलमा आयुबखान कच्छी (वय ५२, रा. लोणंद, ता. खंडाळा, मूळ रा. भिलाई, मध्य प्रदेश), हलिमा मोहम्मद पटेल (वय ४५, रा. कण्हेरी, ता. खंडाळा, मूळ रा. घाटकोपर, मुंबई), शकीनाबाई हरुणशेठ कच्छी (वय ७५, रा. लोणंद) अशी चिरडून ठार झालेल्यांची नावे आहेत. ठार झालेल्यांमध्ये नेहा आणि प्रमोद सख्खे भाऊबहीण आहेत.
याबाबतची अधिक माहिती अशी की, परेल आगाराची एसटी बस (एमएच २0 बीएल २७५९) विट्यावरून परेलकडे निघाली होती. पुणे-बंगलोर महामार्गावर पारगाव येथे ही प्रवासी घेण्यासाठी थांबली होती. याचवेळी पाठीमागून भरधाव वेगाने एक कंटेनर (एमएच 0६ एक्यू ९३१४) येत होता. कंटेनरचालकाचा ताबा सुटला आणि तो एसटीच्या डाव्या बाजूला धडकला. कंटेनरचालकाने अचानक ब्रेक दाबला आणि त्यामुळे कंटेनर कलंडून पाठीमागील बाजूला उभ्या असणाऱ्या प्रवाशांच्या अंगावर पडला. यात हे आठ प्रवासी चिरडले गेले.
रविवार ठरला घातवार
सातारकरांसाठी रविवार घातवार ठरला. या दिवशी एकूण चार अपघात झाले असून, यामध्ये दहाजण ठार आणि सातजण जखमी झाले. पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर काशीळ येथे रविवारी सकाळी साडेसात वाजता झालेल्या पाच वाहनांच्या विचित्र अपघातात सहाजण जखमी झाले. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पारगाव येथे एसटी बसची वाट पाहणारे आठ प्रवासी कंटेनर अंगावर पडल्याने चिरडून जागीच ठार झाले. यानंतर महामार्गावर कवठे येथे झालेल्या अपघातात एक वृद्ध जखमी झाला. कोरेगाव तालुक्यातील भाडळे येथे दुपारी अडीच वाजता झालेल्या अपघातात एकजण ठार झाला. (प्रतिनिधी) (अधिक वृत्त २ वर)

मासांचा लगदा
पारगाव येथील घटना समजताच ग्रामस्थांची गर्दी झाली. कंटेनरखाली कितीजण अडकून पडले आहेत, याची माहिती मिळत नसल्याने सारेच अस्वस्थ झाले.
ग्रामस्थांनी खासगी के्रन मागवून घेतली आणि कंटेनर बाजूला करण्यात आला. त्यावेळी मृतदेहांचे तुकडे झाल्याचे दिसले.
मांसाचे लगदे पाहून अनेकांना भोवळ आली, तर नातेवाइकांनी आक्रोश केला. मृतदेह ओळखूही येत नव्हते. कपड्यांवरून नातेवाइकांनी मृतांची ओळख पटविली.



घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अशोक शेळके त्याचबरोबर स्थानिक ग्रामस्थ अशोक जाधव, युवराज ढमाळ, अजित यादव आणि पंचायत समिती सदस्य अनिरुद्ध गाढवे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी खासगी क्रेन मागवून कंटेनर बाजूला केला आणि खाली सापडलेले मृतदेह बाजूला काढले. ते खंडाळा येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले.

मृतांच्या वारसांना दोन लाख
मृतांच्या वारसांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीतून देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांना घटनेची माहिती समजताच त्यांनी सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांना त्वरित घटनास्थळी पाठवून दिले.
 

Web Title: Eight dead, crushed under the container

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.