उद्यापासून आठ दिवस पावसाचे
By Admin | Updated: September 7, 2015 01:49 IST2015-09-07T01:49:24+5:302015-09-07T01:49:24+5:30
केरळपासून कर्नाटकपर्यंतच्या द्रोणीय स्थितीमुळे ८ ते १५-१६ सप्टेंबर या कालावधीत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासह मुंबईत पावसाची शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविली आहे

उद्यापासून आठ दिवस पावसाचे
मुंबई : केरळपासून कर्नाटकपर्यंतच्या द्रोणीय स्थितीमुळे ८ ते १५-१६ सप्टेंबर या कालावधीत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासह मुंबईत पावसाची शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविली आहे. त्यानंतर मात्र वातावरणात होणाऱ्या बदलामुळे सप्टेंबरचा उत्तरार्ध कोरडाच जाईल, असा अंदाजही हवामान खात्याने वर्तविला आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाने मान्सून राजस्थानातून परतीच्या प्रवासाला लागल्याची घोषणा शुक्रवारीच केली आहे. त्यानंतर परतीचा मान्सून
महाराष्ट्रात दाखल होण्यास आठवड्याभराचा कालावधी लागणार असल्याचेही हवामान खात्याचे म्हणणे आहे. त्यात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पावसाने दडी मारल्याने राज्यासह मुंबईवरील पाणी कपातीचे संकट गडद झाले आहे.
तत्पूर्वी द्रोणीय स्थितीमुळे वर्तविण्यात आलेल्या ठिकाणी पावसाने जोर धरला तर राज्याला काहीसा दिलासा मिळणार आहे. आणि दुसरीकडे सप्टेंबर महिन्याच्या उत्तरार्धात होणाऱ्या वातावरणीय बदलामुळे राज्यासह मुंबईत कोरडेच वातावरण राहील, असेही हवामान खात्याने म्हटले आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत मराठवाड्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. शिवाय ६, ७, ८, ९ आणि १० सप्टेंबर रोजी मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची चिन्हे आहेत. तर पुढील ४८ तासांत मुंबईवरील आकाश ढगाळ राहील व हलका पाऊस पडेल, असा अंदाज आहे. (प्रतिनिधी)
चक्रवात स्थिती
स्कायमेटकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून लक्षद्वीप आणि त्यालगतच्या भागावरील वातावरणात चक्रवात स्थिती निर्माण झाली आहे. या प्रणालीचा प्रभाव तेलंगणापासून कर्नाटकाहून पुढे लक्षद्वीपपर्यंत आहे. त्यामुळे दक्षिण कर्नाटकातील भाग, कर्नाटकची किनारपट्टी आणि त्यालगतचा तामिळनाडूचा भाग तसेच उत्तर केरळ या भागात मध्यम स्वरूपाच्या पावसाची आशा आहे. तर दुसरीकडे मध्य महाराष्ट्रात सध्या सरासरीपेक्षा ४३ टक्के कमी पाऊस झाला आहे.