अकोल्यात आढळला इजिप्शियन गिधाड

By Admin | Updated: January 14, 2015 00:08 IST2015-01-14T00:08:38+5:302015-01-14T00:08:38+5:30

तारांमध्ये अडकून जखमी ; दोन घरटी आढळली.

Egyptian vultures found in Akola | अकोल्यात आढळला इजिप्शियन गिधाड

अकोल्यात आढळला इजिप्शियन गिधाड

अकोला : गिधाडांच्या प्रजातीतील दुर्मीळ इजिप्शियन किंवा युरेशियन व्हल्चर (गिधाड) जिल्ह्यातील सांगळूद येथे मंगळवारी आढळला. विद्युत तारांमध्ये अडकल्याने या पक्ष्याच्या पायाला इजा झाली आहे. गावकर्‍यांनी त्याला स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून वनविभागाच्या स्वाधीन केले.
सांगळूद येथे तारांमध्ये एक पक्षी अडकल्याचे गावकर्‍यांच्या लक्षात आले. पायाला इजा झाल्यामुळे तो जमिनीवर पडला. त्यानंतर गावातीलच काहींनी या पक्ष्यावर उपचार करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अकोला येथील सातपुडा फाउंडेशनचे अमोल सावंत व सर्पमित्र शेख मो. ऊर्फ मुन्ना यांच्याशीही संपर्क केला. त्यांनी पक्ष्यावर उपचार करून, त्याला वनविभागाच्या हवाली केले. याबद्दल माहिती देताना पक्षिमित्र अमोल सावंत यांनी सांगितले, की हा पक्षी गिधाड प्रजातीतील इजिप्शियन व्हल्चर आहे. हा पक्षी प्रामुख्याने आंध्रप्रदेश, तामिळनाडू व महाराष्ट्रात आढळतो. माळरानावर या पक्ष्याचा आढळ आहे. हा पक्षी जिल्ह्यात स्थलांतर करून आला असावा. दोन वर्षांपूर्वी या प्रजातीच्या पक्ष्याचे एक जोडपे निदर्शनास आले होते. त्यांचे हे पिल्लू असू शकते. या पक्ष्याचे घरटे असल्याचे काही नागरिकांनी सांगितले. त्या घरट्यांचा सध्या शोध घेण्यात येत आहे. अकोला जिल्ह्यात या पक्ष्याचे वास्तव्य असणे ही आश्‍चर्यकारक बाब मानली जात आहे.

*वनविभागाला आढळली दोन घरटी
इजिप्शियन व्हल्चर हा पक्षी जखमी अवस्थेत आढळल्यानंतर वनविभागाने सांगळूद परिसरात जाऊन पाहणी केली. त्यांना या पक्ष्याची दोन घरटी व विष्ठा आढळली. त्यामुळे या ठिकाणी या पक्ष्यांचा वावर असल्याचे सिद्ध झाले. दोन घरटी असल्यामुळे दोन मादी नक्कीच असतील. ही मादी दोन अंडी देते. त्यामुळे दोन घरट्यांमधून चार पक्षी किंवा सात ते आठ पक्ष्यांचे वास्तव्य असू शकते, असा अंदाज वनविभागाचे अधिकारी दुबे यांनी वर्तविला आहे.

Web Title: Egyptian vultures found in Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.