नरबळीचा प्रयत्न
By Admin | Updated: September 25, 2014 04:25 IST2014-09-25T04:25:25+5:302014-09-25T04:25:25+5:30
ताहाराबाद येथील शेतात विवाहितेचा गुप्तधनासाठी बळी देण्याचा प्रयत्न तिच्या मामाच्या सतर्कतेमुळे हाणून पडला. मंगळवारी रात्री ही घटना घडली

नरबळीचा प्रयत्न
राहुरी : ताहाराबाद येथील शेतात विवाहितेचा गुप्तधनासाठी बळी देण्याचा प्रयत्न तिच्या मामाच्या सतर्कतेमुळे हाणून पडला. मंगळवारी रात्री ही घटना घडली. पोलिसांनी विवाहितेचा पती, सासू, सासऱ्यासह सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपी फरार झाले आहेत.
राहुरी पोलीस ठाण्यात वृषाली दत्तात्रय विधाटे (हल्ली रा. हवेली, पुणे) या महिलेने याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक सी़ आऱ गावंडे यांनी सासरे साहेबराव विधाटे, सासू लता विधाटे, दीर सागर विधाटे, नवरा दत्तात्रय विधाटे (रा़ हवेली), नणंद रंजना भालेराव व नंदाई (रा. हडपसर, पुणे) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचे ताहाराबाद येथील विधाटे कुटुंब नोकरीनिमित्त पुण्यात स्थायिक झाले आहे़ मंगळवारी सायंकाळी सात वाजता हे कुटुंब पुणे येथून शिर्डीला साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी निघाले़ मात्र त्यांनी वृषाली हिस ताहाराबाद येथील घरी आणले. घराजवळच्या शेतात पूजा करायची असे सांगून सर्वजण शेतात गेले. तेथे सासूच्या अंगात वारे आल्यावर तिने शेतात गुप्तधन असल्याचे सांगितले़. त्यानंतर वृषालीसमोर नारळ, कुंकू, टाचण्या, लिंबू, हळद, काळी बाहुली काढण्यात आली़ वृषाली यांचा नवरा, दीर, सासरा यांनी त्यांचे दोन्ही हात धरून आणलेल्या वस्तू ओवाळून टाकल्या़ त्यानंतर सासूने त्यांच्यावर चाकूहल्ला करण्याचा प्रयत्न केला.
चाकूहल्ला होणार तेवढ्यात वृषाली आरडाओरड करीत पळाल्या. मोठ्या आवाजाने त्यांच्या मामांनी तिकडे धाव घेतली. त्यांनी सर्व प्रकार त्यांना सांगितला़ प्रकरण उलटणार असे दिसताच सासरचे लोक तेथून पळून गेले.
राहुरी पोलीस ठाण्यात नरबळी व इतर अनिष्ठ अमानुष आघोरी प्रथा जादूटोणा प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल झाला आहे़ (प्रतिनिधी)