कैद्यांच्या मुलांसाठी शिक्षण
By Admin | Updated: July 11, 2016 00:32 IST2016-07-11T00:32:02+5:302016-07-11T00:32:02+5:30
येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या बंदीजनांच्या मुलांसाठी शिक्षण सेवा प्रकल्पांतर्गत प्रेरणापथ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे़
_ns.jpg)
कैद्यांच्या मुलांसाठी शिक्षण
पुणे : येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या बंदीजनांच्या मुलांसाठी शिक्षण सेवा प्रकल्पांतर्गत प्रेरणापथ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे़ यात संपूर्ण महाराष्ट्रातून २१२ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.
या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व समाजातील काही मान्यवर मंडळी स्वीकारणार आहे. १४ जुलै रोजी ही बंदी बांधवांची मुले ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्यासोबत पुणे विद्यापीठातील आयुका या जगप्रसिद्ध संशोधन केंद्राला भेट देऊन या प्रकल्पाचा शुभारंभ होणार आहे. या वेळी मंगला नारळीकर या मुलांसोबत संवाद साधणार असल्याचे प्रेरणापथ प्रकल्प समन्वयक डॉ़ मिलिंद भोई आणि उदय जगताप यांनी सांगितले़
कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या बंदीबांधवांच्या मुलांनी केवळ आर्थिक, कौटुंबिक, सामाजिक परिस्थितीच्या प्रतिकूलतेमुळे शिक्षणापासून वंचित न राहता चांगले शिक्षण घेऊन सन्मानाने ताठ मानेने उभे राहावे, यासाठी शिक्षण सेवा प्रकल्प सुरू करण्यात येत आहे.
शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींचे मार्गदर्शन व संवाद, शैक्षणिक साहित्याची मदत, समुपदेशन, व्यवसायाभिमुख प्रशिक्षण, एन. डी. ए, यशदा, बी. जे. मेडिकल, सीओईपी, पुणे विद्यापीठ अशा संस्थांना भेटी, साहित्य, कला, संस्कृती, पोलीस, प्रशासन, चित्रपट आदी क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटी आदी उपक्रमांचा यामध्ये समावेश आहे. महाराष्ट्राचे अतिरिक्त पोलीस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या संकल्पनेतून प्रेरणापथ हा अभिनव उपक्रम येरवडा मध्यवर्ती कारागृहात काही दिवसांपासून राबविला जात आहे.
ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर, डॉ. रघुनाथ माशेलकर, लेखक डॉ. अच्युत गोडबोले, अभिनेते विक्रम गोखले, संगीतकार आनंदजी, संगीतकार प्यारेलाल, खासदार डॉ. नरेंद्र जाधव, चारुदत्त आफळे, व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर
आदींचा सक्रिय सहभाग व
मार्गदर्शन आहे. या वेळी डॉ. भूषण उपाध्याय, उपमहानिरीक्षक स्वाती साठे, कारागृह अधीक्षक यु. टी. पवार, दक्षता अधिकारी राजेंद्र जोशी उपस्थित होते. (प्रतिनिधी)