शिक्षण हेच प्रगतीचे साधन : प्रकाश जावडेकर
By Admin | Updated: July 11, 2016 00:58 IST2016-07-11T00:58:28+5:302016-07-11T00:58:28+5:30
शिक्षण हे प्रगतीचे एक साधन असून ते साध्य करण्याचे मोठे आव्हान शिक्षक व सर्व समाजाने स्वीकारले पाहिजे. त्यातही विद्यार्थ्यांना एक चांगला माणूस बनविण्याची मोठी जबाबदारी शिक्षकांवर आहे

शिक्षण हेच प्रगतीचे साधन : प्रकाश जावडेकर
पुणे : शिक्षण हे प्रगतीचे एक साधन असून ते साध्य करण्याचे मोठे आव्हान शिक्षक व सर्व समाजाने स्वीकारले पाहिजे. त्यातही विद्यार्थ्यांना एक चांगला माणूस बनविण्याची मोठी जबाबदारी शिक्षकांवर आहे, असे मत नवनियुक्त केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले. तसेच मंत्रिपदाची सूत्रे स्वीकारण्यापूर्वी मला घडविणाऱ्या शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करीत मी देशातील सर्व शिक्षकांना वंदन करतो, असेही जावडेकर म्हणाले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीने (डीईएस) आयोजिलेल्या गुरुप्रणाम कृतज्ञता समारंभात जावडेकर बोलत होते. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. द. मा. मिरासदार, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. प्र. ल. गावडे, डीईएसचे डॉ. अजित पटवर्धन, अनंत भिडे आदी याप्रसंगी उपस्थित होते. एमईएस व बीएमसीसीचे माजी विद्यार्थी व केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना शैक्षणिक व सामाजिक जीवनात मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. मॅनेजमेंट गुरू डॉ. प्र. चिं. शेजवलकर, प्रा. शरद वाघ, शंकर दाबके आदी गुरुजनांविषयी जावडेकर यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
शिक्षणक्षेत्रातील जाड भिंती व बंद झालेली कवाडे मला उघडायची आहेत, असे जावडेकर यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे. मात्र, अलीकडच्या काळात सर्व काही आऊटसोर्स करता येते, असे पालकांना वाटते. मात्र, सर्व जबाबदारी शिक्षकांवर सोडून चालणार नाही. जे पालक आपल्या मुलांना आपुलकीने शिकवतात. ती मुले मोठी होतात, असे जावडेकर म्हणाले.
माशेलकर म्हणाले, की शिक्षण ही भविष्याची गुरुकिल्ली आहे. जावडेकर हे शिक्षण क्षेत्रात चांगले काम करून आपला ठसा उमटवतील.
प्र. ल.गावडे म्हणाले, की जावडेकर यांनी गुरुजनांचा सन्मान करून चांगला आदर्श घालून दिला आहे. जावडेकर हे मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळून देशाच्या शिक्षणाला वेगळी दिशा देतील.