प्राप्तिकर आयुक्तास ठोठावली शिक्षा
By Admin | Updated: May 14, 2015 02:20 IST2015-05-14T02:20:42+5:302015-05-14T02:20:42+5:30
मुंबईचे माजी प्राप्तिकर आयुक्त अशोक कुमार पुरवार यांना बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याबद्दल दोषी ठरवून येथील सीबीआय विशेष न्यायालयाने

प्राप्तिकर आयुक्तास ठोठावली शिक्षा
मुंबई : मुंबईचे माजी प्राप्तिकर आयुक्त अशोक कुमार पुरवार यांना बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याबद्दल दोषी ठरवून येथील सीबीआय विशेष न्यायालयाने तीन वर्षांची साधी कैद व एक लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. तसेच पुरवार यांनी भ्रष्टाचार करून मिळविलेली अपसंपदा दडविण्यास मदत केल्याबद्दल त्यांच्या पत्नी श्रीमती छाया यांनाही दोन वर्षांची कैद आणि ५० हजार रुपये दंड अशी शिक्षा देण्यात आली.
भारतीय महसुली सेवेचे १९७१ च्या तुकडीतील अधिकारी असलेले पुरवार पूर्वी अहमदाबाद येथे प्राप्तिकर उपायुक्त व त्यानंतर मुंबईत प्राप्तिकर आयुक्त होते. सीबीआयने डिसेंबर २००१ मध्ये दाखल केलेल्या खटल्यात विशेष न्यायालयाने पुरवार दाम्पत्यास भ्रष्टाचार निर्मूलन कायद्याच्या कलम १३(२) व १३(२) (ई) तसेच भादंवि कलम १०९ अन्वये दोषी ठरवून वरीलप्रमाणे शिक्षा दिली. पुरवार यांनी त्यांच्या उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांहून सुमारे ४०० टक्के जास्त संपत्ती (२.२८ कोटी रु.) भ्रष्ट मार्गांनी कमाविल्याचा त्यांच्यावर आरोप होता. पुरवार पती-पत्नीची दिल्ली, अहमदाबाद व इंदूर येथे निवासी फ्लॅट, आग्रा येथे भूखंड, २.१७ कोटी रुपयांची किसान विकासपत्रे, २० लाख रुपयांचे शेअर्स व बँकांमधील मुदतठेवी आणि पाच लाख रुपयांची उंची ब्रॅण्डेड घड्याळे अशी मालमत्ता तपासातून उघड झाली होती. या सर्व अपसंपदेविषयी सीबीआयने सादर केलेले पुरावे ग्राह्य धरून आणि पुरावरा दाम्पत्याने दिलेले स्पष्टिकरण अमान्य करून न्यायालयाने त्यांना दोषी धरले. तसेच बेहिशेबी मालमत्ता जप्त करण्याचाही आदेश दिला.