ईडीकडून एका बँकेचे आक्षेपार्ह दस्तावेज जप्त
By Admin | Updated: December 22, 2016 20:42 IST2016-12-22T20:42:54+5:302016-12-22T20:42:54+5:30
हजार-पाचशे रुपयांच्या नोटाबंदीच्या काळात अकोल्यातील बँकांनी काळा पैसा पांढरा करण्याचा प्रयत्न केला

ईडीकडून एका बँकेचे आक्षेपार्ह दस्तावेज जप्त
ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 22 - हजार-पाचशे रुपयांच्या नोटाबंदीच्या काळात अकोल्यातील बँकांनी काळा पैसा पांढरा करण्याचा प्रयत्न केला का, याची शहानिशा करण्यासाठी पाच दिवसाआधी ईडीचे (इन्फोर्समेंट डायरेक्टरेट)अंमलबजावणी संचालनालयाचे ४ सदस्यीय पथक अकोल्यात चौकशी करून गेले. अकोला-वाशिम जिल्ह्यात कोट्यवधीची उलाढाल असलेल्या एका नामांकित बँकेत ईडीच्या पथकाने तीन दिवस झाडाझडती घेतली. येथे आढळलेले आक्षेपार्ह दस्तावेजही या पथकाने जप्त केले.
तीन बँकांची झालेली झाडाझडती आणि त्यातील एका बँकेचे आक्षेपार्ह दस्तावेज जप्तीमुळे बँक क्षेत्रातील वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. नोटाबंदीनंतर देशभरात झालेल्या आर्थिक उलाढालीवर ईडीचे लक्ष होते. त्यातून ईडीच्या या अधिकाऱ्यांनी अकोल्यातील तीन नामांकित बँकेला अकस्मात भेट देऊन ही कारवाई केल्याने अनेक बँकांची यंत्रणा हादरली आहे. स्वत:चे आयकार्ड दाखवून या चारही अधिकाऱ्यांनी बँकेतील वरिष्ठांची भेट घेतली. नोटाबंदीनंतर ज्या बँक खात्यात दोन लाख रुपयांच्या वर रकमा जमा झाल्यात, अशा खातेदारांची माहिती त्यांनी घेतली. त्यानंतर हजार-पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा कोणाच्या खात्यात जमा झाल्यात त्यांची माहिती टिपली गेली.
एसबीआयकडून आलेल्या नवीन नोटांचे विनिमय कसे केले गेले, याची माहितीही या अधिकाऱ्यांनी घेतली. व्यवस्थापकांशी, आणि बँक पदाधिकाऱ्यांशीदेखील या पथकाने संवाद साधला; मात्र अत्यंत गोपनीयतेत ही झाडाझडती घेतली गेली. बँक स्ट्राँग रूममधील रक्कम आणि बँक खात्यातील रकमेचा हिशेब तपासून पाहिला. जेथे तफावत आढळली. तेथील व्यवस्थापकांसह संबंधित खात्यांची सखोल चौकशी केली. तीन बँकांपैकी एका बँकेतील आर्थिक व्यवहारात फारसे दोष आढळले नसून एका बँकेत काही रुपयांची तफावत आढळून आली. ज्या बँकेत मोठी तफावत आढळून आली तेथील आक्षेपार्ह दस्तावेज ईडीच्या पथकाने आधीच जप्त केले. आता या चार पथकीय अधिकाऱ्यांच्या अहवालानंतर पुन्हा बँकेची चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तिन्ही बँकेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी याबाबत बोलण्यास नकार दिला. बँकेच्या एका पदाधिकाऱ्यांनी मात्र यास दुजोरा दिला; मात्र कोणतीही माहिती त्यांनी दिली नाही.